सिलिगुडी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी बागडोगरा हवाई दल स्थानकाला भेट देत भारतीय हवाई दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. जवानांचे शौर्य, समर्पण आणि शिस्त यांची प्रशंसा करताना नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतकार्यापासून देशाच्या संरक्षणापर्यंत भारतीय हवाई दलाचे योगदान अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
शिस्तच सामान्य सैनिकाला असामान्य योद्धा बनवते
जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांचे शौर्य आणि समर्पण केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ओळखले जाते. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणे असो किंवा नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत आणि बचावकार्य करणे असो, हवाई दलाचे जवान प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असतात. सशस्त्र दलांमध्ये शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “तंत्रज्ञान कितीही प्रगत असले, तरी शौर्य आणि शिस्तीशिवाय त्याला काहीच किंमत नाही. शिस्त हीच एका सामान्य सैनिकाला असाधारण योद्धा बनवते.” आधुनिक लष्करी क्षमता मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञानासोबत शौर्य, समर्पण आणि शिस्त आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
https://www.prahaar.in/2026/11/07/thane-fire-breaks-out-in-a-locked-unit-within-a-dilapidated-building-in-uthalsar/
ड्रोन आणि सायबर सुरक्षेतील कौशल्य वाढविण्यावर भर
भविष्यातील युद्ध आव्हानांचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याची गरज राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. ड्रोन संचालन, सायबर सुरक्षा आणि बदलत्या युद्धनीतींचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रोन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये जवानांची कौशल्ये अधिक विकसित करणे आवश्यक आहे. सैनिकांच्या सहकार्याने आणि समर्पणाने भारत या दिशेने भक्कम वाटचाल करत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आत्मनिर्भर भारतातून संरक्षण उत्पादनांना चालना
देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत देशातील स्टार्टअप्स आणि औद्योगिक संस्था सैनिकांसाठी ड्रोन, ड्रोनविरोधी प्रणाली आणि आधुनिक उपकरणे विकसित करत आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण उपकरणांच्या निर्मिती आणि वापरात भारतीय सशस्त्र दलांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाची सामरिक क्षमता वाढविण्यासाठी आणि आत्मनिर्भरता मजबूत करण्यासाठी देशांतर्गत संरक्षण उत्पादनांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/11/07/come-to-ayodhya-but-apologize-first-chief-minister-yogi-adityanath-launches-an-attack-on-akhilesh-singh-yadav/
स्थानिक नागरिकांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे आवाहन
संरक्षण मंत्र्यांनी जवानांना स्थानिक नागरिकांशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला. सैनिकांचे वर्तन, गणवेश, संवाद आणि संयम यांवरून स्थानिक नागरिकांमध्ये सशस्त्र दलांची प्रतिमा तयार होते. त्यामुळे ज्या भागात सैनिक तैनात आहेत, तेथील नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. स्थानिक नागरिक आणि सैन्य यांच्यातील संबंध जितके दृढ असतील, तितके शत्रूचे विभाजनवादी कट कमकुवत होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बागडोगरा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या मनात सैन्याबद्दल मोठा आदर आणि प्रेम आहे. जवानांनी आपल्या वर्तनातून आणि कृतीतून हा विश्वास कायम टिकवून ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.