हरियाणा: फरीदाबादच्या सेक्टर 21C मध्ये एका किरकोळ कारणावरून घडलेली अत्यंत खळबळजनक घटना सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. पार्किंगचा वाद आणि कुत्र्याच्या विष्ठेवरून झालेल्या वादातून एका उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मृताची ओळख परमजित धनखर (वय अंदाजे 50+) अशी असून, ते सिंगापूर येथे स्थायिक होते आणि सध्या व्हिएतनामस्थित एफपीटी सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, परमजित धनखर हे त्यांच्या पुतण्याच्या 22 नोव्हेंबरच्या लग्नासाठी 5 नोव्हेंबर रोजीच भारतात आले होते. ते एका चारमजली इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर राहत होते, तर आरोपी मोहन शर्मा हा त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहत होता. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही कुटुंबांमध्ये पार्किंगची जागा आणि आरोपीच्या मुलाने पार्किंगच्या भागात कुत्र्याला शौचास बसवण्यावरून जोरदार वाद सुरू होता. या मुद्द्यावरून यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते.
https://www.prahaar.in/2026/11/07/nashik-tcs-case-big-update-in-tcs-case-case-filed-against-11-people-including-former-mp-corporator/
शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा गाडी पार्क करण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी मोहन शर्मा याने संतापाच्या भरात घरातील परवानाधारक पिस्तूल बाहेर काढले आणि परमजित यांना घराबाहेर बोलावून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आरोपीने तब्बल 15 राऊंड फायर केले, त्यापैकी 9 गोळ्या परमजित यांच्या शरीरात घुसल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच फरीदाबाद पोलीस, क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक रिकामे काडतुसे जप्त केली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. मृताचा मुलगा शौर्य धनखर याच्या तक्रारीवरून सूरजकुंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) (हत्या) आणि आर्म्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी मोहन शर्मा हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. फरीदाबाद पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी यशपाल यादव यांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अनेक विशेष पथके तयार करण्यात आली आहेत आणि त्याला लवकरच गजाआड केले जाईल. या एका घटनेने परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.