Nashik Crime : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे प्रेमसंबंधांच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्यत (आर्यन) सोमनाथ कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आदित्य एकनाथ मोंढे याला अटक केली आहे. गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली.
प्रेमसंबंधांमुळे निर्माण झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आर्यत कांबळे याचे संशयित आदित्य मोंढे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांवरून आदित्यच्या मनात आर्यतविषयी नाराजी होती. याच कारणातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. घटनेच्या दिवशी आदित्यने वाद मिटविण्याच्या बहाण्याने आर्यतला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार दोघांची सापगाव ते ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील स्मशानभूमीजवळ भेट झाली. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर आदित्यने सोबत आणलेल्या धारदार चाकूने आर्यतवर हल्ला केला. त्याच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर आणि हातावर गंभीर वार करण्यात आल्याची माहिती आहे.
मदतीसाठी आरडाओरडा केला…
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आर्यतने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकताच जवळच असलेले मित्र आणि चुलतभाऊ रोशन कांबळे घटनास्थळी धावले. मात्र, हल्ल्यानंतर संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेतील आर्यतला तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
https://www.prahaar.in/2026/11/07/nashik-tcs-case-big-update-in-tcs-case-case-filed-against-11-people-including-former-mp-corporator/
त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक
या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. मृताचा चुलतभाऊ रोशन पप्पू कांबळे याने दिलेल्या तक्रारीवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आदित्य एकनाथ मोंढे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा गजबजलेल्या परिसरात तरुणाची हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रदक्षिणा मार्गावरील सुरक्षा व्यवस्था आणि रात्रीच्या गस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.