Home ताज्या घडामोडी दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

0
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष अन्न सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील 43 अन्न व्यवसायांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत. शिवाय, तब्बल 17 हजार 824 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 63 लाख 9 हजार रुपये इतकी किंमत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईत राज्यातील विविध विभागांमधील 73 दुकानांची तपासणी करण्यात आली.

FDAने मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागांत ही तपासणी मोहीम राबवली. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलम 69 अंतर्गत पाच प्रकरणांमध्ये 70 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये खवा, मावा, पनीर, मिठाई, फरसाण, सुकामेवा आणि खाद्यतेलाचा समावेश आहे. निकृष्ट दर्जा, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

https://www.prahaar.in/2026/11/07/mumbai-cama-hospital-decision-antenatal-care-opd-to-remain-open-on-holidays-for-pregnant-women/

FDAने निलंबित केलेल्या 43 परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रांपैकी सर्वाधिक परवाने नागपूर विभागात आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक म्हणजेच 18 परवानांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर नाशिक विभागात 9, तर मुंबई विभागात 5 परवाने निलंबित करण्यात आले. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागांत प्रत्येकी 3 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. कोकण विभागातील 2 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. मुंबईत लालबाग येथील गुप्ता चणा मार्ट आणि मलबार हिल येथील जैन प्रोव्हिजन स्टोअर्स यांची नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली. चौपाटी येथील द ओरिएंट क्लब, वाळकेश्वर येथील मिष्टी बेला अँड कंपनी आणि घोडपदेव (भायखळा) येथील अमर स्वीटमीट मार्ट यांच्यावरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

याशिवाय कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवरील श्री राम स्वीट अँड फरसाण हे दुकान बंद करण्यात आले असून, तेथील खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागांमध्येही प्रत्येकी तीन आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. दिवाळी अन्न सुरक्षा मोहिमेदरम्यान 29 आस्थापने आणि वाहनांमधून सुमारे 17 हजार 824 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या खाद्यपदार्थांची एकूण किंमत 63 लाख 9 हजार रुपये किंमत आहे. कोकण विभागात सर्वाधिक 13 हजार 970.9 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची किंमत 54 लाख 52 हजार रुपये आहे.

https://www.prahaar.in/2026/11/07/mumbra-police-have-arrested-10-people-including-a-home-guard-jawan-in-connection-with-the-sale-of-a-newborn-baby/

वसई पूर्व येथील पी. बृजवासी मावा बर्फीवाला या आस्थापनातून 4 हजार 193 किलो मावा, खवा, स्वीट कुंदा आणि स्पेशल बर्फी जप्त करण्यात आली. या मालाची किंमत 8 लाख 92 हजार रुपये आहे. भाईंदर पूर्व येथील महालक्ष्मी स्वीट अँड फरसाण मार्टमधून 1 हजार 300 किलो खुली काजू कतली जप्त करण्यात आली. या मिठाईची किंमत तब्बल 15 लाख 86 हजार रुपये असल्याचे FDAने सांगितले. पुणे विभागात 3 हजार 142 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत 5 लाख 66 हजार रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 652 किलो खाद्यपदार्थांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्याची किंमत 2 लाख 33 हजार रुपये आहे. अमरावती विभागात 36.5 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत 13 हजार 140 रुपये आहे.

सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारे नाशवंत खाद्यपदार्थ पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. पालघरमध्ये वाहनांमधून 3,935 किलो खवा आणि मिठाई जप्त करण्यात आली. पालघर जिल्ह्यात FDAने महामार्गावर दोन वाहनांवर केलेल्या कारवाईमध्ये खवा आणि मिठाई जप्त केली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील (NH-8) एका प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. या बसमध्ये 371 किलो गोड हलवा आणि गोड मावा आढळून आला. या मालाची किंमत 99 हजार 400 रुपये आहे. दुसरी कारवाई डहाणू येथील चारोटी टोल प्लाझावर करण्यात आली. NH 48 वर अडवलेल्या वाहनातून 3 हजार 564 किलो खवा, गोड हलवा आणि इतर पारंपरिक मिठाई जप्त करण्यात आली. या मालाची किंमत 9 लाख 85 हजार रुपये किंमत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/07/a-major-relief-from-the-railways-18000-special-trains-to-be-operated-across-the-country-to-manage-the-festive-rush-information-shared-by-union-minister-ashwini-vaishnaw/

FDAच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, दुसऱ्या वाहनातील खाद्यपदार्थांवर कोणतेही लेबल नव्हते. तसेच त्यांची वाहतूक योग्य तापमानात केली जात नव्हती. त्यामुळे हे खाद्यपदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपासणीदरम्यान अनेक आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि साठवण अस्वच्छ वातावरणात केली जात होती. खिडक्यांना जाळ्या नसणे, कीटक नियंत्रणाची अपुरी व्यवस्था आणि अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (FSMS) तसेच FoSTaC संबंधित नोंदी व्यवस्थित न ठेवणे, अशा त्रुटी आढळल्या. काही आस्थापनांमध्ये पाण्याच्या तपासणीचे अहवाल, खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे आणि खरेदीची बिले उपलब्ध नव्हती. या मोहिमेदरम्यान FDAने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी खाद्यपदार्थांचे 10 नमुने घेतले आहेत.

FDA च्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाईल. संबंधित व्यवसायाचा आकार कितीही मोठा असो किंवा त्याचा ब्रँड कितीही प्रसिद्ध असो, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या सणात मिठाई, खवा, मावा आणि फरसाण यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात FDAने सुरू केलेल्या या कारवाईमुळे अन्न व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here