Home एक्सक्ल्युजिव्ह Praful Patel Meets Sharad Pawar : प्रफुल पटेल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Praful Patel Meets Sharad Pawar : प्रफुल पटेल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

0
Praful Patel Meets Sharad Pawar : प्रफुल पटेल यांनी घेतली शरद पवार यांची भेट
प्रफुल पटेल यांनी घेतली शरद पवार यांची भेट (Photo X)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि पार्थ पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी गुरुवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दूरध्वनी करून प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर पटेल यांनी घेतलेल्या या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी पटेल यांनी अन्य नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. राष्ट्रवादीमधील नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट दबावतंत्राचा भाग आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/06/will-reduce-expenditure-on-drain-cleaning-works/

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भेटीमागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “मला शरद पवारसाहेब रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी त्यांना भेटायला आलो. त्यांची तब्येत चांगली आहे. त्यांना फक्त थकवा आला होता. त्यामुळे ते तपासणीसाठी आले आहेत. काय चालले आहे, यावर आमची चर्चा झाली. ते माझे राजकीय गुरू आहेत. मी त्यांच्यासोबत ४० वर्षे काम केले आहे. राजकीय भूमिका बदलली असली, तरी आमचे मन दुरावलेले नाही. मी त्यांना नेहमीच भेटत असतो. त्यांना पुढील दोन-तीन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. यावेळी राज्यात काय सुरू आहे, यावर चर्चा झाली. देशातील आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडींची माहिती घेण्यातही त्यांना रस असतो. मात्र, अन्य कोणतीही विशेष चर्चा झाली नाही.”

दरम्यान, प्रफुल पटेल हे ११ नोव्हेंबरनंतर पुन्हा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते. पार्थ पवार यांच्याविषयीच्या नाराजीच्या चर्चांमुळे दोन्ही राष्ट्रवादीतील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, पटेल यांनी या भेटीचा संबंध कोणत्याही राजकीय चर्चेशी जोडण्याऐवजी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here