नाशिक : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वडनेर दुमाला येथील मे. श्री बालाजी लाडू या आस्थापनेवर तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्या. अस्वच्छ वातावरणात लाडूंची निर्मिती सुरू असल्याचे तसेच मोतीचूर लाडूंमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त अन्नरंग वापरल्याचा संशय आल्याने प्रशासनाने तब्बल २५८ किलो लाडूंचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत ६४ हजार ५०० रुपये असून संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्रही तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
अस्वच्छ वातावरणात लाडूंची निर्मिती
अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत ४ नोव्हेंबर रोजी वडनेर गेट, शिवाजी पुतळ्याजवळील श्री बालाजी लाडू या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान लाडू तयार करण्याची प्रक्रिया आणि अन्नपदार्थांची साठवणूक अस्वच्छ परिस्थितीत होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय तयार करण्यात येणाऱ्या मोतीचूर लाडूंमध्ये विहित प्रमाणापेक्षा अधिक कृत्रिम अन्नरंग वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करत संपूर्ण संशयित साठा जप्त केला.
https://www.prahaar.in/2026/11/06/nashik-crime-a-bloody-chilling-incident-stemming-from-a-love-affair-18-year-old-youth-murdered-with-a-knife-the-event-has-caused-a-stir-in-trimbakeshwar-taluka/
६४ हजार ५०० रुपयांचा माल जप्त
या कारवाईत एकूण २५८ किलो लाडू जप्त करण्यात आले असून त्यांचे बाजारमूल्य ६४ हजार ५०० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दै आणि श्रद्धा राहिंज यांनी प्रत्यक्ष तपासणी करून जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली.
अन्न व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणताही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे काटेकोर पालन करावे. आवश्यक परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा, असे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.