Home ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात पटकावला राष्ट्रीय पुरस्कार!

महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात पटकावला राष्ट्रीय पुरस्कार!

0
महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात पटकावला राष्ट्रीय पुरस्कार!
महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात पटकावला राष्ट्रीय पुरस्कार (Photo: X)

नवी दिल्ली : नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन 2026’च्या समारोप सत्रात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी राज्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. या गौरवाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी अभिनंदन केले. राज्यात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे आणखी बळ मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

गुजरातनंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक

केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘नवीकरणीय ऊर्जा राज्य मूल्यांकन आराखड्या’अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राने गुजरातनंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने मंत्रालयाने हा मूल्यांकन आराखडा तयार केला आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेतील वाढ, धोरणात्मक व नियामक व्यवस्था, वीज ग्रिडची सज्जता, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणुकीसाठीचे वातावरण अशा विविध निकषांवर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मूल्यांकन करण्यात आले.

500 गिगावॅटच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राचे योगदान

नवीकरणीय ऊर्जा विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. जीवाश्म इंधनांव्यतिरिक्त अन्य स्रोतांवर आधारित वीजनिर्मितीची स्थापित क्षमता 2030 पर्यंत 500 गिगावॅटपर्यंत नेण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राच्या उपक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मंत्रालयाने नमूद केले. महाराष्ट्राचा अनुभव आणि यशस्वी उपक्रम इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास मंत्रालयाचे सचिव संतोष सारंगी यांनी व्यक्त केला.

गडकिल्ल्यांच्या संकल्पनेतून हरित ऊर्जेचे दर्शन

2 ते 5 नोव्हेंबरदरम्यान भारत मंडपम येथे आयोजित परिषदेत महाराष्ट्र ‘पार्टनर स्टेट’ म्हणून सहभागी झाला होता. ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित राज्याच्या ऊर्जा दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी दालनातून सादर करण्यात आली. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा यांच्या सहकार्याने महाऊर्जाने हे दालन उभारले. संबंधित संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले.

https://www.prahaar.in/2026/11/06/diwali-advance-aid-of-%e2%82%b94372-crore-for-87-45-lakh-drought-affected-farmers/

हरित ऊर्जा प्रकल्पांची आभासी सफर

दालनातील ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन’ हे अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरले. या माध्यमातून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पाची आभासी सफर अनुभवता आली. याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 आणि ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेची माहितीही देण्यात आली. दृकश्राव्य आणि संवादात्मक डिजिटल सादरीकरणांसह दालनातील सेल्फी बूथला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.

सौर ऊर्जा प्रकल्पांना अधिक गती देणार

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वसाधारण श्रेणीत महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक मिळविणे ही राज्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती असल्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी सांगितले. या यशात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. सौर ऊर्जेसह विविध नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना अधिक गती देण्यावर राज्य सरकारचा भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here