Dhanteras 2026: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसपासून होते. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरा केला जातो. यंदा 6 नोव्हेंबर 2026, शुक्रवार रोजी धनतेरस साजरा केला जात आहे.
धनतेरसला धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी सोने, चांदी, भांडी आणि इतर शुभ वस्तूंची खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. धनतेरसच्या दिवशी पूजा करताना या सणाशी संबंधित पौराणिक कथा वाचणेही शुभ मानले जाते. समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट होण्याची कथा आणि राजा हेम यांच्या पुत्राच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या पत्नीची कथा विशेष प्रचलित आहे. चला तर जाणून घेऊया धनतेरसच्या या दोन महत्त्वाच्या पौराणिक कथा.
समुद्रमंथनातून झाली भगवान धन्वंतरींची उत्पत्ती
पौराणिक कथेनुसार, एकदा महर्षी दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवराज इंद्रासह सर्व देवतांचे सामर्थ्य कमी झाले होते. देवतांची शक्ती कमी झाल्याचा फायदा घेत असुरांनी त्यांच्यावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देवता संकटात सापडले. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी मदतीची विनंती केली. त्यावेळी भगवान विष्णूंनी देवतांना असुरांसोबत मिळून क्षीरसागराचे समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. समुद्रमंथनातून अमृत प्राप्त होईल आणि त्याचे सेवन केल्याने देवतांना पुन्हा सामर्थ्य प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर देवता आणि असुरांनी मिळून समुद्रमंथन सुरू केले. या मंथनातून अनेक दिव्य रत्ने आणि मौल्यवान वस्तू बाहेर आल्या. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन समुद्रातून प्रकट झाले.भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्राचे देवता मानले जाते. त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. त्यामुळेच धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी भगवान धन्वंतरींची मनोभावे पूजा केल्याने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.
https://www.prahaar.in/2026/11/06/dhanatrayodashi-2026-avoid-purchasing-these-7-items-on-dhanatrayodashi-it-could-bring-inauspiciousness-into-your-home/
राजा हेम यांचा पुत्र आणि त्याच्या पत्नीची कथा
धनतेरसशी संबंधित आणखी एक लोकप्रिय पौराणिक कथा राजा हेम आणि त्यांच्या पुत्राशी जोडलेली आहे. कथेनुसार, राजा हेम यांच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला. ज्योतिषांनी राजकुमाराची कुंडली पाहिल्यानंतर एक भविष्यवाणी केली. राजकुमाराचा विवाह झाल्यानंतर चौथ्याच दिवशी त्याचा मृत्यू होईल, असे त्यांनी सांगितले.ही भविष्यवाणी ऐकून राजा आणि राणी अत्यंत दुःखी झाले. त्यांनी आपल्या मुलाला संकटापासून वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले. कालांतराने राजकुमार मोठा झाला आणि त्याचा एका सुंदर व गुणवान कन्येशी विवाह झाला.
लग्नानंतर राजकुमाराच्या मृत्यूची भविष्यवाणी पूर्ण होण्याची वेळ जवळ आली. ही गोष्ट समजल्यानंतर त्याच्या पत्नीने कोणत्याही परिस्थितीत पतीचे प्राण वाचवण्याचा निर्धार केला. ज्या रात्री राजकुमाराचा मृत्यू होणार होता, त्या रात्री त्याच्या पत्नीने एक विशेष उपाय केला. तिने घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोन्या-चांदीचे दागिने आणि सोन्याची नाणी ठेवली. संपूर्ण महालात दिवे लावून प्रकाश केला. एवढेच नाही तर पतीला झोप येऊ नये म्हणून ती रात्रभर त्याला गाणी आणि गोष्टी ऐकवत जागे ठेवत होती.
पत्नीच्या युक्तीमुळे यमराजांना परतावे लागले
पौराणिक कथेनुसार, ठरलेल्या वेळी यमराज सर्पाचे रूप धारण करून राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी आले. मात्र, घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा आणि दिव्यांच्या प्रकाशाचा तेजस्वी झगमगाट पाहून यमराजांचे डोळे दिपून गेले.त्यामुळे त्यांना राजकुमाराच्या खोलीपर्यंत पोहोचता आले नाही. यमराज त्या दागिन्यांच्या ढिगाऱ्यावर बसून राजकुमाराच्या पत्नीने गायलेली गाणी ऐकत राहिले. अशा प्रकारे संपूर्ण रात्र निघून गेली आणि राजकुमाराच्या मृत्यूची निर्धारित वेळ टळली. सकाळ होताच यमराजांना तेथून रिकाम्या हाताने परतावे लागले. अशा प्रकारे राजकुमाराच्या पत्नीच्या चातुर्यामुळे आणि प्रेमामुळे त्याचे प्राण वाचले, अशी धार्मिक कथा सांगितली जाते.
https://www.prahaar.in/2026/11/06/today-is-dhanatrayodashi-perform-the-lakshmi-kubera-puja-during-this-auspicious-time-find-out-the-most-favorable-moment-for-purchasing-gold-and-silver/
धनतेरसला यमदीपदान का केले जाते ?
धनतेरसशी संबंधित या कथेमुळेच या दिवशी घराबाहेर दिवा लावण्याची परंपरा सुरू झाली, अशी मान्यता आहे. धनतेरसच्या रात्री यमराजाच्या नावाने दिवा लावून त्याचे दान केले जाते. या विधीला ‘यमदीपदान’ असे म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, धनतेरसच्या दिवशी यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते आणि कुटुंबावर यमराजाची कृपा राहते. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा करण्यासोबतच यमदीपदानालाही विशेष महत्त्व दिले जाते. आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
टीप : वरील कथा धार्मिक आणि पौराणिक मान्यतांवर आधारित आहेत.