NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता हे कार्ड 1 जानेवारी 2027 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप स्मार्ट कार्ड काढलेले नाही, त्यांना आणखी काही दिवस एसटी प्रवास सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची अद्याप कार्ड नोंदणी पूर्ण झालेली नाही. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांकडून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
31 डिसेंबरपर्यंत कार्डशिवाय मिळणार सवलत
एसटी महामंडळाने यापूर्वी 1 ऑक्टोबर 2026 पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक लाभार्थ्यांची नोंदणी अपूर्ण असल्याने या निर्णयाला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.नवीन निर्णयानुसार, 7 नोव्हेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड नसतानाही एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे.मात्र, 1 जानेवारी 2027 पासून सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/06/cannabis-worth-%e2%82%b93-72-crore-seized-from-packets-of-noodles-and-dry-fruits-passenger-arrested-at-pune-airport/
आतापर्यंत 1 कोटी 10 लाख स्मार्ट कार्डची नोंदणी
एसटी महामंडळाकडून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे 1 कोटी 10 लाख स्मार्ट कार्डची नोंदणी आणि वितरण करण्यात आले आहे.मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांची कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ग्रामपंचायत स्तरावर होणार विशेष नोंदणी शिबिरे
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड मिळावे, यासाठी एसटी महामंडळाकडून ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे.या विशेष मोहिमेअंतर्गत 31 डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी काय करावे ?
NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही मुदतवाढ कायमस्वरूपी नसून 31 डिसेंबर 2026 पर्यंतच आहे. त्यामुळे ज्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी अद्याप NCMC स्मार्ट कार्ड काढलेले नाही, त्यांनी या कालावधीत आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांनी मुदत संपण्यापूर्वी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.