Home ताज्या घडामोडी Mantralaya Diwali Celebration: ‘आपलं मंत्रालय’च्या काव्यसंध्येने दीपोत्सवात फुलला शब्दांचा आनंदोत्सव; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी व्यासपीठ

Mantralaya Diwali Celebration: ‘आपलं मंत्रालय’च्या काव्यसंध्येने दीपोत्सवात फुलला शब्दांचा आनंदोत्सव; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी व्यासपीठ

0
Mantralaya Diwali Celebration: ‘आपलं मंत्रालय’च्या काव्यसंध्येने दीपोत्सवात फुलला शब्दांचा आनंदोत्सव; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी व्यासपीठ

मुंबई : राज्यात सगळीकडे दिवाळीनिमित्त आनंदाचे वातावरण आहे. नोकरदार वर्ग ऑफिसमध्ये आनंदाने दिवाळी साजरी करतात. त्याच अनुषंगाने दीपावलीनिमित्त ‘आपलं मंत्रालय’च्या वतीने मंत्रालयातील परिषद सभागृहात काव्यसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. या गृहपत्रिकेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळते, असे वक्तव्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. (Mantralaya Diwali Celebration)

यावेळी बोलताना, मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये अनेक कवी आणि साहित्यप्रेमी दडलेले आहेत. त्यांच्या साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांना आपल्या कविता आणि साहित्य सादर करण्याची संधी मिळावी, या हेतूने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यांना आपल्या कविता व साहित्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लेखनाचे आणि साहित्याचे मनापासून स्वागत आहे. आपलं मंत्रालय हे मासिक आपले आहे. ‘आपलं मंत्रालय’ हे केवळ एक मासिक नसून ते मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या मासिकाशी सर्वांनी आपलेपणाने जोडले जावे, त्यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या लेखनातून मासिक अधिक समृद्ध करावे, असे आवाहनही यावेळी प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.

https://www.prahaar.in/2026/11/06/big-news-for-st-bus-passengers-extension-of-deadline-for-ncmc-card-for-women-and-senior-citizens/

तसेच दिवाळीनिमित्त आयोजित ‘आपलं मंत्रालय’ काव्यसंध्येत सहभागी झालेल्या कवींच्या विविध विषयांवरील कवितांनी भावना, विचार आणि अनुभवांचे सुंदर विश्व उलगडले. शब्दांच्या या मैफलीतून कवितांच्या आनंदोत्सवात मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. या कार्यक्रमासाठी अपर मुख्य सचिव विकास  खारगे, संचालक, डॉ. किशोर गांगुर्डे, संचालक, गोविंद अहंकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक वर्षा आंधळे, मुख्यमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे उपस्थित होते.

दरम्यान, वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते, तसेच तिला विचार करण्याची नवी दृष्टी मिळते. सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याची ताकद ही वाचनात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासली पाहिजे. शासनाच्या वतीने साहित्य, कला आणि संगीत क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमांचा लाभ घ्यावा. संबंधित विभागांच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन घेऊन आपल्या अंगभूत कलागुणांना अधिक विकसित करावे, असे आवाहनही अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी बोलताना यावेळी केले.

या कार्यक्रमात सतीश मोघे, डॉ. नामदेव भोसले, मीनाक्षी पाटील, लिना संखे, अंजली ढमाळ, अजय भोसले, नामदेव कोळी, डॉ. जगदीश मोरे, शशी डंभारे, प्रवीण कुलकर्णी यांनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील विविध भावभावनांचे प्रतिबिंब सादर झालेल्या कवितांमधून उमटले. तसेच प्रत्येक कवितेच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कविता, शब्द आणि भावनांच्या या सुरेख मैफलीने दीपावलीच्या आनंदोत्सवात साहित्यिक रंग भरले. तसेच वाघूर या नामदेव कोळी यांच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here