मुंबई (विशेष प्रतिनिधी)
देवनार डम्पिंग ग्राउंडसह चार कचरा हस्तांतरण केंद्रांसाठी आता नोंदणीकृत कचरा वेचक संस्थांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने स्वारस्य अर्ज मागवण्यात आले आहे. सहा महिन्यांचा कालावधीसाठी या संस्थांची निवड केली जाणार असून या माध्यमातून कचरा वेचकांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा केला जाणार आहे. याठिकाणच्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा वेचक या आपल्यासाठी आवश्यक तेवढ्या वस्तू काढून घेत त्यातून आपला उदरनिर्वाह करतील.
https://www.prahaar.in/2026/11/03/diwali-approaching-the-fda-has-stepped-up-its-activity-in-maharashtra-it-has-seized-a-stock-of-adulterated-goods-worth-22-lakh-rupees-in-mumbai-and-suspended-the-license-of-several-shops/
मुंबई महापालिकेच्यावतीने महालक्ष्मी, वर्सोवा, कुर्ला आणि वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्रांसह देवनार डम्पिंग ग्राऊंडवर दरदिवशी २६५० ते २७५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. याठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्यातून कचरा वेचक प्लास्टिक, कागद, धातू, काच, ई-कचरा आणि इतर पुनर्वापरयोग्य वस्तूंचे वर्गीकरण करून त्या विकून चार पैसे पदरात पाडून घेतात. या कचरा वर्गीकरणातून मिळणाऱ्या सुक्या कचऱ्याच्या विक्रीतून कचरा वेचकांचा उदरनिर्वाह चालतो.
त्यामुळे या पाचही ठिकाणी कचरा वेचकांचा सहभाग असावा यासाठी नोंदणीकृत कचरा वेचकांकडून महापालिकेच्यावतीने स्वारस्य अर्ज मागवले आहे. या पाचही ठिकाणी पाच स्वतंत्र नोंदणीकृत संस्थेची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये ५० कचरा वेचक आणि इतर कचरा हस्तांतरण केंद्रांमध्ये प्रत्येकी २५ कचरा वेचक यांचा समावेश असेल. म्हणजेच पाच ठिकाणी मिळून किमान १५० कचरा वेचकांना कामाची संधी उपलब्ध होऊ शकते. आणि याच कचरा वेचकांना त्याठिकाणी कचऱ्यातून पुनर्वापरयोग्य सुका कचरा वेगळा करण्याचा अधिकार असेल.