Home एक्सक्ल्युजिव्ह कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारणार; मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागाचे बळ

कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारणार; मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागाचे बळ

0
कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारणार; मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागाचे बळ

मुंबई : दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीत बाधित नागरिकांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या व्यवस्थेद्वारे कंपन्या, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारण्यात येणार आहे. हा निधी गरजू रुग्णांच्या उपचारांसह आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मदतीला सामाजिक सहभागाची जोड मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षाच्या आढावा बैठकीत रुग्णांच्या उपचारांसाठी सामाजिक दायित्वातून अतिरिक्त निधी उभारण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. या सोसायटीच्या माध्यमातून कंपन्या, संस्था आणि देणगीदारांकडून निधी उभारून तो गरजूंपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/03/making-travel-easier-for-mumbaikars-a-major-step-by-western-railway-for-long-distance-passengers-with-plans-for-32-new-trains/

महागड्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच दीर्घकालीन उपचारांसाठीही या निधीचा वापर करता येणार आहे. दुर्मिळ आजारांवरील उपचार, आवश्यक औषधे, वैद्यकीय साहित्य आणि उपचारांशी संबंधित अन्य खर्चासाठी मदत देण्याची तरतूद या माध्यमातून करता येईल. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीत बाधित नागरिकांनाही या निधीतून मदत उपलब्ध करून देता येणार आहे.

वैद्यकीय मदतीपुरते या सोसायटीचे कार्य मर्यादित राहणार नसून, गरजेनुसार विविध सामाजिक उपक्रमांनाही निधी उपलब्ध करून देता येणार आहे. गरीब नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वितरण, दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना सहाय्य आणि सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन यांसारखे उपक्रम राबविता येतील. आरोग्यविषयक जनजागृती, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांनाही या माध्यमातून मदत करता येणार आहे. रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, कंपन्या आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून गरजेनुसार वैद्यकीय मदतीचे उपक्रम राबविणे, हा या व्यवस्थेचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी या उपक्रमासाठी कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. सामाजिक सहभागातून अधिक संसाधने उभारून गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा या सोसायटीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here