बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता वेगवेगळ्या आर्थिक आणि तांत्रिक धाग्यांच्या आधारे पुढे जात आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली असून, विशेष मकोका न्यायालयाने या बाराव्या आरोपीला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपीच्या बँक खात्यातून याच प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयात दिली. या पैशांचा वापर गोळीबारासाठी वापरण्यात आलेली दुचाकी खरेदी करण्यासाठी तसेच गुन्ह्याशी संबंधित इतर खर्च भागवण्यासाठी झाला असावा, असा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे आता या आर्थिक व्यवहारांचा नेमका उद्देश काय होता आणि या पैशांचा वापर कोणत्या कामासाठी करण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमर सुरेंद्र मुंडिया असे असून, त्याला हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा परिसरातून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. मुंबई गुन्हे शाखेने त्याला मुंबईत आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि त्यानंतर शनिवारी त्याला विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीच्या बँक खात्यातून झालेल्या पैशांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. पैसे नेमके कुठून आले, ते कोणत्या माध्यमातून पाठवण्यात आले आणि यासाठी कोणत्या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करण्यात आला, हे शोधायचे आहे. तसेच या व्यवहारांमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करायचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मात्र, आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, बँकेचे व्यवहार आणि तांत्रिक पुरावे तपासण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, न्यायालयाने तपासाची कागदपत्रे आणि केस डायरी तपासल्यानंतर आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यानुसार अमर मुंडिया याला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
https://www.prahaar.in/2026/11/01/ashwin-silenced-a-netizen-who-was-trolling-sanju-samson-following-his-poor-performance-in-the-t20-series-against-new-zealand/
या सर्व आरोपींच्या भूमिकेबाबत तपास यंत्रणांनी न्यायालयात काही महत्त्वाचे दावे केले आहेत. गोळीबाराच्या कटामध्ये दोन स्वतंत्र गट काम करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यातील एका गटाकडे शस्त्रांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती, तर दुसऱ्या गटाकडे ही शस्त्रे प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या शूटर्सपर्यंत पोहोचवण्याचे काम होते, अशी माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली होती. एवढेच नाही, तर आरोपी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सामान्य संवाद माध्यमांऐवजी काही लपवलेल्या किंवा गुप्त संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲप्लिकेशन्सचा वापर करत असल्याचाही तपास यंत्रणांचा दावा आहे पोलिसांनी या प्रकरणात शस्त्रे आणि डिजिटल पुरावे हस्तगत केले असले, तरी संपूर्ण कटामध्ये प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, याबाबत अजून तपास बाकी असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते. या गुन्ह्यातील फरार आरोपी अनिल पंडित आणि गुन्हेगारी टोळीतील इतर सदस्यांशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे काय संबंध आहेत, हेही तपासातून स्पष्ट करायचे आहे. अनिल पंडित हा तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा कथित सहकारी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/26/11th-accused-arrested-in-tiger-shroff-attack-case-remanded-in-police-custody-till-october-31/
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेपासून झाली. टायगर श्रॉफ एका फुटबॉल मैदानातून आपल्या कारने बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन शूटर्सनी त्याच्या कारच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. या घटनेत टायगर श्रॉफला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, त्याचा कारचालक आणि घटनास्थळी उपस्थित असलेला एक व्लॉगर गोळी लागल्याने जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, सोशल मीडियावर काही पोस्टच्या माध्यमातून बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी 27 ऑक्टोबर रोजी आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लागू केला.
आता या प्रकरणात बाराव्या आरोपीच्या अटकेनंतर तपासाला आर्थिक व्यवहारांच्या दिशेनेही महत्त्वाचे वळण मिळाले आहे. गोळीबारासाठी वापरलेल्या दुचाकीची खरेदी, पैशांचे व्यवहार, गुप्त संवादासाठी वापरलेली ॲप्लिकेशन्स आणि फरार आरोपींशी असलेले कथित संबंध या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. त्यामुळे 6 नोव्हेंबरपर्यंतच्या पोलीस कोठडीत तपास यंत्रणांच्या हाती आणखी कोणते धागेदोरे लागतात आणि या संपूर्ण कटामध्ये कोणाकोणाची भूमिका समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.