Manisha Bhanwala : भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. कझाकस्तानमधील अस्ताना येथे शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत मनीषाने महिलांच्या 59 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले. या कामगिरीसह जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या ए. एलिझाबेथ नेटचा 8-6 असा पराभव केला.
https://www.prahaar.in/2026/10/31/where-did-the-2-lakh-trees-planted-in-beed-as-compensation-for-the-trees-cut-down-for-the-middle-vaitarna-dam-end-up/
पिछाडीवरून दमदार पुनरागमन करत जिंकले सुवर्णपदक
अंतिम सामना मनीषासाठी सोपा नव्हता. पहिल्या फेरीच्या अखेरीस ती 1-6 अशी पिछाडीवर होती. मात्र, तिने हार न मानता दुसऱ्या फेरीत आक्रमक खेळ केला. प्रतिस्पर्धी खेळाडूवर प्रभावी हल्ले करत तिने सामन्याचे चित्र पालटले आणि अखेर 8-6 अशा फरकाने विजय मिळवला.
मनीषाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही उल्लेखनीय ठरला. तिने जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लॉरेन्स ब्यूरेगार्डचा पराभव केला. त्यानंतर मंगोलियाच्या बोलोर्तुया खुरेलखूवर मात केली. कझाकस्तानच्या अल्टीन शागायेवाला चितपट करत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला.
Manisha Bhanwala became India’s first woman wrestling world champion.🔥
She defeats USA’s Abigail Nette 8-6 in the 59kg final after coming back from a 0-6 deficit. https://t.co/e0LSJKdU4g
— subash kumar (@Krishan10_) October 31, 2026
जागतिक स्पर्धेत भारतीय महिलांची उल्लेखनीय कामगिरी
या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली. नीलम सिरोहीने 50 किलो, तर काजल धोचकने 76 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली. मात्र, दोघींनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मनीषाच्या आधी अंशु मलिक ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी एकमेव भारतीय महिला होती. तिने 2021 मध्ये 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. विनेश फोगाटने या स्पर्धेत दोन कांस्यपदके, तर अंतिम पांघलनेही दोन कांस्यपदके पटकावली आहेत.
विविध वजनी गटांतील अनुभवाचा फायदा
हरियाणातील जिंद येथील रहिवासी असलेली 29 वर्षीय मनीषा अनुभवी कुस्तीपटू आहे. तिने यापूर्वी 57 किलो ते 65 किलो अशा विविध वजनी गटांमध्ये स्पर्धा केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने 57 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकारी फुजिनामीकडून तिला पराभव स्वीकारावा लागला.
त्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने 59 किलो वजनी गटात सहभाग घेतला. हा निर्णय तिच्यासाठी यशस्वी ठरला आणि तिने कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले. विशेष म्हणजे, 59 किलो हा वजनी गट ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नाही. तरीही जागतिक स्पर्धेतील हे सुवर्णपदक भारतीय महिला कुस्तीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरले आहे.