मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि सुरक्षेची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी येत्या रविवार, दिनांक 01.11.2026 रोजी मोठा ‘मेगा ब्लॉक’ घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मुंबईकरांच्या रविवारच्या प्रवासावर मोठा परिणाम होणार असून, हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नाहक त्रास टाळण्यासाठी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/30/special-block-at-diva-station-to-affect-two-express-trains-what-is-the-schedule-for-other-trains/
मेन लाईनवरील ब्लॉक आणि बदल
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार स्थानकांदरम्यानच्या ‘अप’ आणि ‘डाउन’ धिम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक चालणार आहे.
- डाउन धीम्या सेवा: CSMT मधून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा CSMT ते विद्याविहारदरम्यान ‘डाउन’ जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुन्हा विद्याविहार येथून धीम्या मार्गावर जातील.
- अप धीम्या सेवा: घाटकोपर येथून सकाळी 10:19 ते दुपारी 3:52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल, विद्याविहार ते CSMT दरम्यान ‘अप’ जलद मार्गावर चालवल्या जातील आणि ठरलेल्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील.
https://www.prahaar.in/2026/10/30/new-delhi-to-varanasi-vande-bharat-sleeper-express-launch-train-timings-and-click-here-for-more-information/
ट्रान्स-हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
- केवळ मेन लाईनच नव्हे, तर ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या अडचणींमध्येही वाढ होणार आहे. ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत ‘अप’ आणि ‘डाउन’ ट्रान्स-हार्बर मार्ग पूर्णपणे बंद राहील.
- ठाणे येथून सकाळी 10:35 ते सायंकाळी 4:07 वाजेपर्यंत वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या सर्व डाउन ट्रान्स-हार्बर सेवा पूर्णपणे रद्द राहतील.
- पनवेल, नेरुळ आणि वाशी येथून सकाळी 10:25 ते दुपारी 4:09 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने धावणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/30/mumbai-local-updates-western-railway-operate-to-night-block-between-borivali-and-bhayandar-on-saturday-check-details-here/
इतर मार्गांवरील सेवा सुरळीत
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरेगाव आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा, तसेच नेरुळ/बेलापूर – उरण दरम्यानच्या पोर्ट लाईन सेवा नेहमीप्रमाणे रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.
पायाभूत सुविधांची सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी ही तांत्रिक व देखभालीची कामे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टळावी म्हणून रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.