मुंबई (विशेष प्रतिनिधी): लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण आणि अराजकतेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई महायुतीच्या वतीने उत्तर मुंबईत शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ हा या पदयात्रेचा मुख्य संदेश असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
या पदयात्रेचा प्रारंभ सायंकाळी ४.०० वाजता स्वामी विवेकानंद पुतळा, स्वामी विवेकानंद रोड, बोरीवली (पश्चिम) येथून होणार असून, पदयात्रेचा समारोप सप्ताह मैदान, कमला विहार स्पोर्ट्स क्लबसमोरील समाज मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/10/30/mumbai-mayor-ritu-tawde-praises-successful-transition-towards-eco-friendly-ganeshotsav-celebrations-in-the-city/
या पदयात्रेत भाजपचे केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयुषजी गोयल, व उत्तर मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधी, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. लोकशाहीची मूल्ये जपणे, जनतेचा आवाज बुलंद करणे आणि लोकशाही व्यवस्थेविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
उत्तर मुंबईतील सर्व नागरिकांनी, युवकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन लोकशाहीच्या रक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुंबई महापालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी केले आहे.