Home नाशिक कुंभमेळा Nashik Kumbhmela : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक निर्बंध, 30 आणि 31ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वरमध्ये वाहनांना ‘नो-एंट्री’

Nashik Kumbhmela : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक निर्बंध, 30 आणि 31ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वरमध्ये वाहनांना ‘नो-एंट्री’

0
Nashik Kumbhmela : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक निर्बंध, 30 आणि  31ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वरमध्ये वाहनांना ‘नो-एंट्री’

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षित वाहतूक, गर्दीचे नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक रोहितकुमार राजपूत यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या कालावधीत त्र्यंबकेश्वर गावातील स्थानिक रहिवाशांची वाहने तसेच गावाबाहेरील वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, आवश्यक ठिकाणी प्रवेशबंदी अर्थात नो-एंट्री लागू करण्यात येणार आहे.

स्थानिक रहिवाशांसाठी स्वतंत्र मार्ग

त्र्यंबकेश्वर गावातील स्थानिक रहिवाशांनी गावात येण्यासाठी आणि गावाबाहेर जाण्यासाठी रिंगरोड – निवृत्तीनाथ मंदिर – पोलीस स्टेशन – थ्री लिव्हज हॉटेल – कुंभारतळे पार्किंग – जुना जव्हार फाटा या निश्चित मार्गाचा वापर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमधील ज्या स्थानिक रहिवाशांना नाशिकला जायचे आहे, त्यांनी सापगावमार्गे नाशिककडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन जव्हार फाटा आणि रिंगरोडवरून प्रवेशबंदी

निर्धारित कालावधीत गावाबाहेरील वाहनांना नवीन जव्हार फाटा येथून त्र्यंबकेश्वर गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, रिंगरोड येथूनही गावात प्रवेश करण्यास बंदी लागू करण्यात येणार आहे. या ठिकाणी आवश्यकतेनुसार नो-एंट्रीचे आदेश लागू करून प्रवेशबंदीचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन जव्हार फाटा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – लक्ष्मीनारायण चौक या मार्गावर इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/29/nashik-kumbhmela-will-president-droupadi-murmus-itinerary-change-due-to-rain-forecasts-preparations-underway-for-travel-by-road-instead-of-helicopter/

विशेष परवानगी नसलेल्या वाहनांना गर्दीच्या भागात प्रवेश नाही

शासन अथवा प्रशासनाची विशेष परवानगी नसलेल्या इतर वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरातील गर्दीच्या आणि प्रतिबंधित भागात प्रवेश दिला जाणार नाही. अशा वाहनांसाठी जुना जव्हार फाटा – थ्री लिव्हज हॉटेल – कुंभारतळे पार्किंग – निवृत्तीनाथ मंदिर – रिंगरोड या मार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११६ अन्वये वाहतूक दिशादर्शक आणि वाहतूक चिन्हे लावण्याबाबत पुढील कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल करण्याचे तसेच अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील लागू तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि अन्य वाहनचालकांनी निर्धारित मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here