Home ब्रेकिंग न्यूज ॲग्रीगेटर कंपन्यांवर AI ची नजर! मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे निर्देश

ॲग्रीगेटर कंपन्यांवर AI ची नजर! मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे निर्देश

0
ॲग्रीगेटर कंपन्यांवर AI ची नजर! मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे निर्देश

राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र ॲग्रीगेटर नियमावली-2026 संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहन संख्या, स्वतंत्र टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वाहन आणि चालकांची संपूर्ण माहिती एका प्लॅटफॉर्मवर

ॲग्रीगेटर कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालविण्याचा परवाना, पोलीस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणता चालक कोणते वाहन चालवितो, याची अद्ययावत नोंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध होईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहनांचे संचालन, चालकांच्या पाळ्या आणि अन्य महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण करता येईल. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करणे शक्य होईल.

https://www.prahaar.in/2026/10/29/nitesh-rane-issues-directives-for-the-economic-prosperity-of-fishermen-a-district-wise-action-plan-to-be-prepared/

प्रवास वाटपातील पारदर्शकतेसाठी अल्गोरिदमचे परीक्षण

ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांवर प्रवास दिला जातो, याचे परीक्षण करता येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रवास वाटपामध्ये भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे त्यांनी निर्देश दिले. प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासोबतच स्थानिक चालकांना रोजगाराच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रवास वाटप आणि कंपन्यांच्या कामकाजावर तांत्रिक देखरेख या बाबींना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/10/29/major-boost-for-agriculture-and-food-processing-industries-in-wardha-mou-worth-2100-crore-signed-in-the-presence-of-chief-minister-fadnavis/

राज्यातील ॲग्रीगेटर क्षेत्राचा विस्तार आणि प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी, सक्षम आणि गतिमान नियामक यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र टॅक्सीचालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्त यांचा समतोल राखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here