Home महाराष्ट्र नाशिक Dhule Accident : धुळ्यात भीषण अपघात ! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; मोरदडच्या दोन चुलत भावांचा मृत्यू

Dhule Accident : धुळ्यात भीषण अपघात ! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; मोरदडच्या दोन चुलत भावांचा मृत्यू

0
Dhule Accident : धुळ्यात भीषण अपघात ! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; मोरदडच्या दोन चुलत भावांचा मृत्यू

धुळे : धुळे शहराजवळील बोरविहिर गाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात मोरदड येथील दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत विनोद शामा बागुल यांचा जागीच मृत्यू झाला, तर सागर काशिनाथ बागुल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरदड गावासह संपूर्ण धुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

न्यायालयीन कामासाठी धुळ्यात आले होते दोघे भाऊ

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरदड येथील विनोद बागुल आणि सागर बागुल हे दोघे चुलत भाऊ न्यायालयीन कामकाजासाठी दुचाकीवरून धुळे शहरात आले होते. न्यायालयातील काम पूर्ण करून ते आपल्या गावी परतत होते. याचदरम्यान बोरविहिर गावाजवळील टोलनाक्याच्या परिसरात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोर असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात विनोद शामा बागुल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सागर काशिनाथ बागुल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.

https://www.prahaar.in/2026/10/27/jalgaon-shaken-tragedy-strikes-just-before-daughters-engagement-husband-and-wife-die-after-suffering-an-electric-shock-in-a-field/

एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा मृत्यू; गावावर शोककळा

या अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याने बागुल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सागर काशिनाथ बागुल हे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही परिचित होते. एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याची बातमी समजताच मोरदड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.धुळे शहराजवळ घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here