Home मनोरंजन मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

0
मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन
मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन फोटो सौजन्य: आशिष शेलार (X Account)

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे यंदा आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. हा महोत्सव मुंबईच्या प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे 15 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/26/nashik-crime-shocking-case-of-cyber-fraud-in-nashik-senior-lawyer-swindled-out-of-3-80-lakh-without-even-opening-an-apk-file-sent-via-whatsapp/

मराठी चित्रपटांना फक्त महाराष्ट्रामध्येच प्रेक्षकवर्ग न मिळवून देता, जगभरातून प्रेक्षकवर्ग देण्यासाठी, मराठी चित्रपट अधिक व्यापक पद्धतीने जगासमोर यायला हवा, याकरिता नव्या पिढीच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना प्रोत्साहन देत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे दुसरे पर्व संपन्न होत असून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे- पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग व महामंडळाचे संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

https://www.prahaar.in/2026/10/26/yes-im-madly-in-love-with-my-partner-rashmika-mandanas-8-page-slap-at-trollers-vijay-deverakonda-also-criticized-the-trolls/

‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’बद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार काय म्हणाले…

 

ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेडेकर हे यंदाच्या महोत्सवाचे संचालक, तर सिनेअभ्यासक- दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे हे क्युरेटर आहेत. विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासांतील अधिकाऱ्यांनाही महोत्सवासाठी विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.

चित्रपट प्रदर्शनाबरोबर यंदाच्या पर्वात पाच परिसंवाद, पाच विशेष मुलाखती आणि पाच मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर चर्चा सत्र पार पडणार आहे. चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदान दिलेल्या कलाकारांच्या मुलाखतींतून त्यांचे अनुभव, विचार आणि कार्यप्रवास उलगडला जाईल. चित्रपटनिर्मितीतील तंत्र, कला आणि विविध पैलूंवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा अर्थात मास्टरक्लासेस घेतले जाणार आहेत. याशिवाय, मराठी चित्रपटांच्या शतकोत्तर वाटचालीचा प्रवास आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आलेख मांडणारे विशेष प्रदर्शनही महोत्सवस्थळी आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनातून मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि चित्रनगरीचे योगदान यांचा वेध घेण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/26/tiger-shroff-firing-case-22-year-old-engineer-executed-attack-on-tiger-shroff/

यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे ‘पुस्तक ते सिनेमा’ (बुक टू स्क्रीन) हा उपक्रम. मराठीतील उत्तम कथाविषय असलेल्या आणि चित्रपटाच्या माध्यमात रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या पुस्तकांचे लेखक व प्रकाशक यांना चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्मिती संस्थांशी संवाद साधण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्यकृतींचे चित्रपटांमध्ये रूपांतर होण्यासाठी व्यावसायिक सहकार्याचे नवे मार्ग खुले व्हावेत, हा या उपक्रमामागील हेतू आहे, अशी माहिती महामंडळाच्या वतीने यावेळी देण्यात आली. तसेच ‘तरुणांच्या नजरेतून महाराष्ट्र’ या विषयावर लघुपट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून नावीन्यपूर्णता, सर्जनशीलता आणि कथनशैली यांच्या आधारे तीन लघुपटांची निवड केली जाईल. निवडलेल्या लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात करण्यात येणार आहे. यामुळे नव्या पिढीतील चित्रपटकर्त्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.

यंदाच्या महोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या आयोजनातून मिळणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. कोणताही विशेष डामडौल न करता चित्रपटकलेला प्राधान्य देऊन महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी नोंदणी शुल्क प्रतिव्यक्ती 100 रुपये ठेवण्यात आले आहे. या नोंदणी शुल्कातून जमा होणारा महसूल दुष्काळ निवारणाच्या कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येईल. याशिवाय, दुष्काळग्रस्तांसाठी अतिरिक्त योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘डोनर पास’ अर्थात ‘सामाजिक कृतज्ञता प्रवेशिका’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here