आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. सकाळी साधारण १० वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत अचानक भीषण तांत्रिक बिघाड झाल्याने अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशांमधील धीम्या व जलद मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे कोलमडली. तासनतास गाड्या एकाच जागी उभ्या राहिल्याने चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. या गोंधळाच्या आणि वाहतूक कोंडीच्या वातावरणात भांडुप रेल्वे स्थानकात एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला भरधाव एसी लोकलने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
भांडुप रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ जवळ ही घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून (CSMT) ठाणे व कल्याणच्या दिशेने जात असलेल्या एसी लोकलच्या मार्गात ट्रॅक ओलांडणारा तरुण आला. गाडीचा वेग आणि अचानक आलेला प्रसंग यामुळे मोटरमनला गाडी रोखणे कठीण झाले. एसी लोकलची धडक इतकी प्रचंड होती की, संबंधित तरुण ट्रेनसोबत सुमारे १५ ते २० फूट अंतरापर्यंत फरफटत गेला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच प्राण गेला. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण हा स्थानिक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. साहिल थिटे असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समजते.
https://www.prahaar.in/2026/10/26/mumbai-commuters-forced-to-walk-on-railway-tracks-between-mulund-and-nahur-as-local-train-services-disrupted-watch/
सकाळी १० च्या सुमारास सिग्नल केबिनमध्ये लागलेल्या आगीमुळे कांजूरमार्ग स्थानकापुढील संपूर्ण सिग्नल यंत्रणा अचानक ठप्प झाली. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मोटरमन्सना लोकल गाड्या जिथे होत्या तिथेच थांबवाव्या लागल्या. १ ते २ तास उलटूनही गाड्या पुढे सरकत नसल्याने हवालदिल झालेल्या अनेक प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत पुढचे स्थानक गाठण्याचा मार्ग निवडला. तांत्रिक काम पूर्ण करून काही तासांनंतर वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली असली, तरी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक पार विस्कळीत झाले होते. याचा थेट परिणाम संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेवर झाला. सर्व प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची अलोट गर्दी साचली होती. ऐन गर्दीच्या वेळी सेवा कोलमडल्याने प्रवाशांमधून मध्य रेल्वेच्या प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस (GRP) आणि आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.