वसई : वाढत्या नागरीकरणामुळे आणि प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे सातत्याने अपुरी पडणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेला अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेंतर्गत शहराला मंजूर झालेल्या एकूण १०० बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील तब्बल ४० पर्यावरणपूरक अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस दिवाळीपूर्वी महापालिकेच्या ताफ्यात दाखल होत आहेत. या नव्या बसेसमुळे सणासुदीच्या काळात नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असून, बसमधील गर्दी आणि लटकंतीच्या प्रवासापासून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे.
प्रवाशांचा वाढता ताण आणि जुन्या समस्या
https://www.prahaar.in/2026/10/23/threat-to-blow-up-amitabh-bachchans-jalsa-bungalow-with-a-bomb-stir-in-mumbai/
वसई-विरार हे मुंबई आणि ठाण्याला लागून असलेले अत्यंत महत्त्वाचे उपनगर असल्याने येथे नोकरदार वर्गाची संख्या खूप मोठी आहे. सध्या महापालिकेकडे असलेल्या १२० बसेसपैकी अवघ्या ४० ई-बसेस प्रत्यक्ष मार्गावर धावत आहेत. या बसेसद्वारे ३६ विविध मार्गांवरून दररोज ६५ हजारांहून अधिक नागरिक प्रवास करतात. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत गाड्यांची संख्या अतिशय तोकडी असल्याने गर्दीच्या वेळी बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नसे. त्यातच सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे आंदोलन, नादुरुस्त बसेस आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी वाहतूक अनेकदा कोलमडत असे. त्यामुळे या नवीन बसेसची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती.
अंतर्गत मार्गांवर धावणार नव्या गाड्या
केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या ‘जेबीएम’ या पुरवठादार कंपनीसोबतच्या कायदेशीर करार आणि तांत्रिक अडचणींमुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या या बसेस काही काळ रखडल्या होत्या. मात्र, आता सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे दूर झाले असून पहिल्या टप्प्यातील ४० बसेस रस्त्यावर धावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. या नव्या गाड्यांमुळे ज्या मार्गांवर प्रवाशांचा जास्त भार आहे, तिथे फेऱ्या वाढवणे शक्य होईल; तसेच आतापर्यंत सार्वजनिक वाहतुकीपासून वंचित राहिलेल्या शहराच्या अंतर्गत भागांमध्ये नवीन मार्ग सुरू करणे शक्य होणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी दिली आहे.
आधुनिक आगारांची उभारणी आणि तात्पुरती व्यवस्था
या ई-बसेसच्या चार्जिंग, पार्किंग आणि तांत्रिक देखभालीसाठी नवघर (वसई) आणि नालासोपारा येथे अत्याधुनिक ई-बस आगारांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाचा २७.१७ कोटी रुपये आणि महापालिकेचा १० कोटी रुपये असा एकूण ३७.१७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. या डेपोंचे काम ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले आहे. आगाराचे काम पूर्ण होईपर्यंत या ४० बसेस विरार महापालिका मुख्यालयालगतच्या आगारातून तात्पुरत्या स्वरूपात चालवल्या जाणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे वसई-विरारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणस्नेही होणार यात शंका नाही.