Home ब्रेकिंग न्यूज Chhath Puja Train Rush : दिवाळी अन् छठपूजेचा माहोल! पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; प्रशासनाकडून विशेष सुरक्षा उपाय लागू

Chhath Puja Train Rush : दिवाळी अन् छठपूजेचा माहोल! पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; प्रशासनाकडून विशेष सुरक्षा उपाय लागू

0
Chhath Puja Train Rush : दिवाळी अन् छठपूजेचा माहोल! पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; प्रशासनाकडून विशेष सुरक्षा उपाय लागू
Chhath Puja Train Rush

पुणे : दिवाळीचा सण आणि पाठोपाठ येणारी छठपूजा यामुळे सध्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अक्षरशः लोट लोटताना दिसत आहे. दरवर्षी या काळात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजरी होणारी छठपूजा आणि दिवाळीच्या सुट्यांमुळे पुढील महिनाभर स्थानकावर हीच गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, कोणतीही अनुचित घटना किंवा चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली असून कडक नियोजन सुरू केले आहे.

फलाटांवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘होल्डिंग झोन’ची निर्मिती

गाडी फलाटावर लागण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवर होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने एसटी बसस्थानकाजवळ (व्हीआयपी कक्षाशेजारी) एका विशेष ‘होल्डिंग झोन’ ची उभारणी केली आहे. ज्या प्रवाशांचे रेल्वे तिकीट कन्फर्म आहे, अशाच प्रवाशांना थेट फलाटावर प्रवेश दिला जाणार आहे. तर प्रतीक्षा यादीतील किंवा अनारक्षित तिकीट असलेले प्रवासी या होल्डिंग झोनमध्ये थांबतील. याठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गाडी येण्याच्या वेळेसच प्रवाशांना शिस्तीत फलाटावर सोडता येईल.

https://www.prahaar.in/2026/10/21/major-threat-to-internet-security-critical-flaws-found-in-8-digital-certificates-from-emudhra/

सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर; फलाट तिकीटविक्री बंद करण्याचा निर्णय

प्रवाशांची वाढती आवक लक्षात घेता रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि स्थानक प्रशासनाचे अधिकारी २४ तास तैनात असणार आहेत. गर्दी प्रमाणाबाहेर वाढल्यास स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून ‘फलाट तिकीट’ (Platform Ticket) विक्री तात्पुरती बंद करण्याचा कठोर निर्णयही प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो. तसेच, उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळी प्रवाशांची रांग शिस्तबद्ध राहावी म्हणून फलाट क्रमांक एकवर विशेष बॅरिकेडिंग व रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

तिकीट खिडक्या आणि सुविधांमध्ये वाढ

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. सध्या स्थानकावर एकूण ६ फलाट असून येथून रोज तब्बल ११७ गाड्या सुटतात, तर २७९ गाड्यांची ये-जा असते. येथील दैनंदिन प्रवासी संख्या ही सुमारे १ लाख ९० हजार इतकी प्रचंड आहे. ही गर्दी लक्षात घेता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या कार्यरत असलेल्या ९ तिकीट खिडक्या आणि १८ स्वयंचलित तिकीटविक्री यंत्रांच्या (ATVM) संख्येमध्ये वाढ करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे.

प्रशासनाचे आवाहन :

प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या प्रवासाच्या वेळेनुसार योग्य ती काळजी घ्यावी, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहेरा यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here