Home ब्रेकिंग न्यूज ‘Janak’ Marathi Movie: सायली संजीवच्या नव्या भूमिकेची चर्चा! ‘जनक’मधून उलगडणार बाप-लेकीच्या नात्याची कहाणी

‘Janak’ Marathi Movie: सायली संजीवच्या नव्या भूमिकेची चर्चा! ‘जनक’मधून उलगडणार बाप-लेकीच्या नात्याची कहाणी

0
‘Janak’ Marathi Movie: सायली संजीवच्या नव्या भूमिकेची चर्चा! ‘जनक’मधून उलगडणार बाप-लेकीच्या नात्याची कहाणी

ज्या बापाने लेकीसाठी आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम दिलं, त्याच बापावर जेव्हा आरोपांचं सावट येतं, तेव्हा त्याच्या सन्मानासाठी लेकच ढाल बनून उभी ठाकते! एका बाजूला आरोपांचं वादळ, तर दुसऱ्या बाजूला बापासाठी सर्वस्व पणाला लावणारी लेकीची जिद्द. अशा संघर्षातून उलगडणारा ‘जनक’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा प्रवास नाही, तर स्वाभिमानासाठी पेटलेल्या लढ्याची कहाणी आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सिनेप्रेमींच्या भेटीला आला असून, त्यातील भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.

अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’

चित्रपटाचा टीझर बाप-लेकीच्या नात्याची ताकद दाखवतानाच अनेक प्रश्न उपस्थित करतो. या टीझरमध्ये सायली संजीव एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसत असून, तिच्या व्यक्तिरेखेचा नवा आणि दमदार पैलू पाहायला मिळतो. वडिलांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी म्हणून तिच्या भूमिकेतील ताकद आणि भावनिक खोली लक्ष वेधून घेते. दुसरीकडे, आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित करणारे अविनाश नारकर यांनी पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. एका बाजूला वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, तर दुसऱ्या बाजूला वडिलांसाठी लढण्याची वेळ, अशा परिस्थितीत सायलीची भूमिका कथेला नवं परिमाण देणारी ठरणार आहे. तर सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा यांच्यात रंगणारा कोर्टरूम ड्रामा चित्रपटातील न्यायालयीन संघर्षाला निर्णायक वळण देणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/22/rohit-shetty-to-school-the-contestants-this-weekend-why-will-salman-khan-be-absent/

अभिषेक कंवर यांनी ‘जनक’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओंकार भसमे यांचे असून, त्रिलोक सिंग राजपूत यांनी असोसिएट प्रोड्युसर, तर सुजीत मुकाटे यांनी कार्यकारी निर्माते म्हणून योगदान दिले आहे. चित्रपटाचे संगीत आदित्य कडताने यांनी दिले आहे. न्यायालयात नेमकं काय घडणार? सत्याचा विजय होणार की आरोपांच्या सावटाखाली एका बापाचा स्वाभिमान हरवणार? या प्रश्नांची उत्सुकता टीझरमधून अधिकच वाढते. नात्यांची कसोटी, स्वाभिमानाची लढाई आणि न्यायालयातील उत्कंठावर्धक संघर्ष उलगडणारा अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ हा कोर्टरूम थ्रिलर १३ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here