Home ब्रेकिंग न्यूज Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

0
Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून गेल्या वर्षभरात देशभरात कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या १५४ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या या पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

https://www.prahaar.in/2026/10/21/4-people-including-two-women-arrested-in-tiger-shroff-related-firing-case-accused-of-bringing-weapons-into-mumbai/

कार्यक्रमाला विविध देशांच्या दूतावासांतील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमाचे संयोजन केले.

कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन संचलन आयोजित केले जाते. यंदा १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्य तसेच अर्धसैनिक दलातील कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here