Nashik Crime News : नाशिकमध्ये अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत एका महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजार पूजाविधीने बरा करण्याचे आणि दैवी शक्तीच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संबंधित महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून अघोरी विधी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजार बरा करण्याचे आमिष अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील अस्थमाने त्रस्त असलेल्या एका महिलेला नाशिकच्या गंगापूर शिवारात राहणाऱ्या अरुण धोंडू पाटील याच्या कथित दैवी शक्तींबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. आरोपानुसार, संशयिताने महिलेला नाशिकला आणण्यासाठी पनवेल येथे वाहन पाठवले. महिलेला आणि तिच्या पतीला डोळ्यांवर काळी पट्टी बांधून नाशिकला आणण्यात आले. येथे कथित पूजाविधी केल्यानंतर त्यांना पुन्हा पनवेलला सोडण्यात आले. अशाच प्रकारे दुसऱ्यांदा विधी करण्यात आला. त्यानंतर आजारात सुधारणा झाल्याचा भास झाल्याने महिलेचा संबंधित व्यक्तीवरील विश्वास वाढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे मागवले
महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने तिला पैशांचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. त्यासाठी मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगण्यात आले. त्यानंतर महिलेला आणि तिच्या पतीला पुन्हा डोळ्यांवर काळी पट्टी बांधून नाशिकमधील गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ आणण्यात आले. तिथे कथित अघोरी पूजाविधी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या विधीदरम्यान महिलेला तिचे कपडे काढून पांढरे, पारदर्शक पातळ वस्त्र नेसवण्यात आले. तसेच मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
https://www.prahaar.in/2026/10/20/speeding-petrol-tanker-hits-a-two-wheeler-in-malegaon/
तीन पूजाविधींसाठी उकळले साडेसात लाख रुपये
तक्रारीनुसार, एका पूजेसाठी महिलेने पाच लाख रुपये दिले होते. यावेळी संशयिताने सुमारे दोन तास मंत्रोच्चार करून कथित अघोरी विधी केला. या विधीदरम्यान बोकडाचा बळी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर घरी गेल्यावर पैशांचा पाऊस पडेल, असे सांगून महिलेला आणि तिच्या पतीला पुन्हा पनवेलला सोडण्यात आले. अशा तीन पूजाविधींसाठी संबंधित व्यक्तीने एकूण साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र, घरी परतल्यानंतर पैशांचा पाऊस पडला नाही आणि महिलेच्या आजारातही अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताकडून टाळाटाळ करणारी उत्तरे मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी संशयित अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
दैवी शक्ती, मंत्र-तंत्र, अघोरी पूजा किंवा विधींच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे आजार बरा करण्याच्या किंवा कमी वेळेत मोठा पैसा मिळवून देण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा अवास्तव दाव्यांवर विश्वास न ठेवता फसवणुकीचा संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.