मुंबई (विशेष प्रतिनिधी): बोगदा खणनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित सुरक्षा मानकांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी तसेच संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना अधिकारी व यंत्रणांना दिल्या आहेत. मलबा वाहतूक व विल्हेवाट लावणे आणि प्रकल्प स्थळ व परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आज सकाळी प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बोगदा खणन कार्यपद्धती, सुरू असलेले खणनकार्य, प्रकल्पाची सद्यस्थिती व प्रगती तसेच विविध तांत्रिक बाबींची आश्विनी भिडे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच, कार्यस्थळावरील सुरक्षितता, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, बांधकामाची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व उपाययोजनांचादेखील आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (पायाभूत प्रकल्प) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.(ASHWINI BHIDE)
https://www.prahaar.in/2026/10/19/breaking-three-arrested-in-connection-with-attack-on-tiger-shroff/
गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्प टप्पा 3 (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) द्वारे 5.30 किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी ‘तुळशी’ हे पहिले बोगदा खणन संयंत्र 17 ऑगस्ट 2026 रोजी कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत बोगद्याचे 183 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, ‘विहार’ या दुस-या बोगदा खनन संयंत्राची (टीबीएम) स्थळ स्वीकृत चाचणी पूर्ण झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे संयंत्र कार्यान्वित होवून खोदकामास प्रत्यक्ष सुरुवात होईल.
गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणा-या बोगद्याचे खोदकाम ‘तुळशी’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत आहे. आतापर्यंत बोगद्याचे 183 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या 87 कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरुपातील 6 कंकणाकृती कडांचीही उभारणी ‘तुळशी’च्या मदतीने करण्यात आली . त्याची पाहणी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केली.
https://www.prahaar.in/2026/10/19/whoever-the-mastermind-behind-this-may-be-they-will-soon-chief-minister-devendra-fadnaviss-reaction-to-the-tiger-shroff-firing-incident/
‘विहार’ या दुस-या बोगदा खनन संयंत्राची (टीबीएम)स्थळ स्वीकृत चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्याने दुस-या बोगद्याच्या खोदकामास ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष सुरूवात केली जाणार आहे.(VIHAR)
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या की, प्रकल्प अंतर्गत बोगदा खणन कामाला सुरुवात झाली असून, एका बाजूने सुमारे 183 मीटर लांबीचे बोगदा खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. प्रतिदिन खोदकामाची सरासरी 5.5 मीटर इतकी आहे. त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या निर्धारित कालमर्यादेनुसार कामाची गती सातत्याने कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. खोदकामात कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामाची प्रगती, उपलब्ध यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी तसेच मनुष्यबळाची आवश्यकता यांचा नियमितपणे आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. बोगदा खणनाचे काम हे अत्यंत तांत्रिक, गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक स्वरूपाचे असल्याने कामाच्या वेगासोबतच कामगार व अभियंते यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.