Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon : जळगावातील बांभोरी पुलावर भीषण अपघात ! कार-कंटेनरच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Jalgaon : जळगावातील बांभोरी पुलावर भीषण अपघात ! कार-कंटेनरच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू

0
Jalgaon : जळगावातील बांभोरी पुलावर भीषण अपघात ! कार-कंटेनरच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू
पुसद-दिग्रस मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन स्कुटीवरील दोघांचा मृत्यू (Photo Google)

जळगाव : जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिंमत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी अशी मृत तरुणांची नावे असून, तिघेही धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावचे रहिवासी होते. या घटनेमुळे झुरखेडे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

देवीच्या यात्रेवरून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी हे तिघेही कारने प्रवास करत होते. भुसावळजवळील वनोली येथे देवीची यात्रा सुरू असल्याने ते एका नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले होते. तेथील काम पूर्ण करून ते जळगावच्या दिशेने आले आणि त्यानंतर आपल्या झुरखेडे या गावी परतत होते. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान बांभोरी पुलावर त्यांच्यावर काळाने घाला घातला.

कारचा चक्काचूर; तिघांचाही जागीच मृत्यू

बांभोरी पुलावर समोरून येणाऱ्या कंटेनरची कारला जोरदार धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेनंतर कार जागेवर फिरल्याचेही सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात कारमधील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, धडकेनंतर कंटेनरही पुलाच्या पुढील बाजूने खाली कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील कारची अवस्था पाहून धडकेची तीव्रता स्पष्ट होत होती.

https://www.prahaar.in/2026/10/19/whoever-the-mastermind-behind-this-may-be-they-will-soon-chief-minister-devendra-fadnaviss-reaction-to-the-tiger-shroff-firing-incident/

नागरिकांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीसाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, या अपघातात तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना गेल्या काही दिवसांत घडलेल्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव वाहने आणि रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीमुळे होणाऱ्या जीवितहानीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.

झुरखेडे गावावर शोककळा

या भीषण अपघाताची बातमी झुरखेडे गावात आणि मृतांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत तरुणांच्या नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गर्दी केली होती. तरुणांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. तिघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याने या दुर्घटनेचा मोठा फटका संबंधित कुटुंबांना बसला आहे. देवीच्या यात्रेसाठी नातेवाईकाकडे गेलेला प्रवास परतीच्या वाटेवर दुर्दैवी अपघाताने संपल्याने झुरखेडे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here