Mumbai Crime News: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एजीटीएफ (AGTF) आणि कोटा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही कारवाई केल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गोळीबाराची घटना घडल्यानंतर तिन्ही संशयित फरार झाले होते. ते मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एजीटीएफ आणि कोटा पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला. त्यानंतर कोटा रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करून तिघांना ताब्यात घेण्यात आले.
#WATCH | Firing on Bollywood actor Tiger Shroff: Three accused have been arrested by Rajasthan’s Kota Police. Two are residents of Haryana and one of Bihar. The Kota City Police team apprehended them from a train, Kota SP Tejaswani Gautam confirmed to ANI
(Visuals from Kota SP Office)
— ANI (@ANI) October 19, 2026
दोन संशयित हरियाणातील, एक महाराष्ट्रातील
प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांपैकी दोघे हरियाणातील, तर एक महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात प्रत्येकाची नेमकी भूमिका काय होती, तसेच त्यांना अन्य कोणाची मदत मिळाली होती का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या गोळीबारामागील कारण, कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्ती आणि संशयितांना मिळालेल्या मदतीबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक तपशील स्पष्ट होतील.
टायगरवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई पोलिसांना तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तसेच काही संशयितांची ओळख पटल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. हल्लेखोरांना भित्रे संबोधत फडणवीस म्हणाले की, अंधारातून हल्ले करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.