भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे ‘दसरा’ किंवा ‘विजयादशमी’. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा होणारा हा सण म्हणजे असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा झालेला विजय मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कडक उपवासांची सांगता याच मंगल दिवशी होते. यंदाच्या म्हणजेच २०२६ मधील दसऱ्याची नेमकी तारीख, रावण दहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे धार्मिक महत्त्व पंचांगानुसार स्पष्ट झाले आहे.
दसरा नक्की कोणत्या दिवशी आहे ? (तिथीची माहिती)
पंचांग गणनेनुसार, यंदा अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथीची सुरुवात मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२:५० वाजता होणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २:११ मिनिटांपर्यंत राहील.
शास्त्रोक्त नियम, प्रदोष व्रत आणि विजयामुहूर्ताचा अभ्यास करता, उदयतिथी आणि धार्मिक नियमांनुसार मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजीच रावण दहन करणे अत्यंत उत्तम व फलदायी ठरणार आहे. त्यामुळे या वर्षी दसऱ्याचा मुख्य उत्साह २० ऑक्टोबरलाच अनुभवायला मिळेल.
https://www.prahaar.in/2026/10/16/russia-kamchatka-7-magnitude-earthquake-no-tsunami-threat/
रावण दहन आणि पूजेसाठी महत्त्वाचे मुहूर्त
दसरा म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनात येतो तो भव्य रावण दहनाचा सोहळा. धार्मिक परंपरेनुसार, रावण दहन प्रामुख्याने ‘प्रदोष काळात’ करणे शुभ मानले जाते. यावर्षीचे मुख्य मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत:
प्रदोष काळ मुहूर्त : २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५:४७ वाजता सुरू होईल; त्यामुळे संध्याकाळी ५:४७ नंतर कधीही रावण दहन करणे योग्य राहील.
विजय मुहूर्त : दुपारी १:५९ ते २:४५ वाजेपर्यंत असेल.
विशेष पूजा व नक्षत्र योग : दुपारी १:१० ते ३:३० दरम्यान पूजा-अर्चा करणे अत्यंत फलदायी ठरेल. या कालावधीत ‘श्रवण नक्षत्र’ देखील असेल, ज्याची सुरुवात १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३८ वाजता होऊन, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०२ वाजता समाप्ती होईल.
दसऱ्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व
‘विजयादशमी’ या शब्दाचा अर्थच असा आहे की, ‘विजेची आणि सत्याची तिथी’. पौराणिक आख्यायिकेनुसार, याच दिवशी भगवान श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून सृष्टीला त्याच्या त्रासातून मुक्त केले होते. रावणाची दहा तोंडे ही मानवातील दहा वेगवेगळ्या वाईट प्रवृत्तींचे (उदा. अहंकान, क्रोध, लोभ, ईर्ष्या इ.) प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे रावणाच्या पुतळ्याचे दहन करणे म्हणजे आपल्या मनातील व समाजातील वाईट विचारांचा अंत करणे होय.
शस्त्रपूजेची प्राचीन परंपरा आणि महिषासुर वध
दसऱ्याच्या दिवशी केवळ रावण दहनच नाही, तर आपल्या संस्कृतीत ‘शस्त्रपूजेला’ देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही परंपरा केवळ हत्यारांची पूजा पुरती मर्यादित नसून, ती धर्म, न्याय आणि वाईट शक्तींच्या विनाशाचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार, याच पवित्र दिवशी माता दुर्गेने भयंकर राक्षस महिषासुराचा वध करून देवांना आणि जगाला त्याच्या दहशतीपासून मुक्त केले होते. जेव्हा देवांची शक्तीही महिषासुरापुढे कमी पडली, तेव्हा माता आदिशक्तीने सर्व शस्त्रास्त्रांनिशी युद्धाचे नेतृत्व करत त्याचा अंत केला. संकटांचा सामना करण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी ज्ञानाचा आणि शस्त्रांचा आदर करणे गरजेचे असते, हाच संदेश या परंपरेतून मिळतो. संपूर्ण देशभरात हा सण अतिशय उत्साह, श्रद्धा आणि जल्लोषात साजरा केला जातो.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. प्रहार या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही. )