लंडन : इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर आणि माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी 21व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट गोलंदाजांची टॉप 10 यादी निवडली आहे. या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला तिसरे स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बुमराहने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांसारख्या दिग्गजांपेक्षा वरचे स्थान पटकावले आहे. बटलर आणि ब्रॉड यांनी त्यांच्या ‘For the Love of Cricket’ या पॉडकास्टमध्ये ही क्रमवारी मांडली. या यादीत ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर दिवंगत शेन वॉर्न याला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. वॉर्नने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 1,001 बळी घेतले होते. त्याच्यानंतर इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 991 बळी घेतले असून, तो कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
भारताचा जसप्रीत बुमराह हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करण्यासोबतच भारतीय खेळपट्ट्यांवरही बळी मिळवण्याची त्याची क्षमता उल्लेखनीय आहे. त्याच्या अचूक यॉर्कर, वेगातील विविधता आणि भेदक गोलंदाजीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा चौथ्या क्रमांकावर, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन सहाव्या क्रमांकावर असून, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1,347 बळी घेतले आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/14/shikhar-dhawan-warns-legal-action-misuse-name-pakistan-players-link/
दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला सातवे, कागिसो रबाडाला आठवे आणि शॉन पोलॉकला नववे स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत भारताचे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अनिल कुंबळे यांच्यासह न्यूझीलंडचा टिम साउदी आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे या निवडीवर क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
बटलर आणि ब्रॉड यांची टॉप 10 यादी: शेन वॉर्न, जेम्स अँडरसन, जसप्रीत बुमराह, ग्लेन मॅकग्रा, पॅट कमिन्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, कागिसो रबाडा, शॉन पोलॉक आणि मिचेल स्टार्क.