Home एक्सक्ल्युजिव्ह MPSC News : MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार रजेवर; असं घडलं सर्वकाही

MPSC News : MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार रजेवर; असं घडलं सर्वकाही

0
MPSC News : MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार रजेवर; असं घडलं सर्वकाही

पुणे : एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, यासाठी सरकारने चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससी अध्यक्षांना पदापासून दूर ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे आंदोलनातील प्रमुख मागण्यांवर सरकारने पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.

दरम्यान, विवेक भीमनवार यांनीही या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांनी संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला प्राधान्य दिले आहे. पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्यासाठी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांचे हित यांना आपले नेहमीच प्राधान्य राहिले असून, यापुढेही ते कायम राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला आहे. माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, निवृत्त आयएएस अधिकारी गणेश पाटील आणि आयपीएस अधिकारी लक्ष्मी गौतम यांचा आयोगात समावेश आहे. तुकाराम मुंढे हे आयोगाचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here