मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत सध्या पाणीकपात कायम असताना आणि भविष्यातील पाण्याचे संकट असताना धुळीचे प्रदुषण कमी करण्यासाठी टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याचा प्रस्तावाला विरोध करत स्थायी समितीने हा प्रस्ताव परत प्रशासनाकडे पाठवून दिला आहे. महापालिकेने प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार करावा. रस्ते पाण्याने धुणे हा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे धुळ शोषून येणाऱ्या यंत्राचा वापर करावा. परंतु रस्ते टँकरच्या पाण्याने धुणे हा पर्याय असून शकत नाही. मुंबईकरांवर पाणी कपात लागू असताना अशाप्रकारे रस्ते पाण्याने धुणे हे योग्यच नाही असे सांगत या प्रस्तावाला स्थायी समितीने तीव्र विरोध करत प्रस्ताव दप्तरी दाखल केला.
https://www.prahaar.in/2026/10/09/when-will-the-manora-mla-residence-become-operational-what-percentage-of-the-work-is-complete/
मुंबईतील वायू व धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवणे तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे यामध्ये समतोल साधण्याच्या उद्देशाने, मुंबईतील वाढते वायू व धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकर १५० दिवसांसाठी (पावसाळा वगळून) भाडेतत्त्वावर सात परिमंडळांसाठी सेवा घेवून त्यावर सुमारे आठ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी पाणी कपात लागू असताना लोकभावना लक्षात घेता हा प्रस्ताव दप्तरी दाखल(रेकॉर्ड) करण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली. या उपसूचनेला शिवसेनेचे गटनेते अमेय घाेल यांनीही पाठिंबा देत हा प्रस्ताव ज्यांनी आणला त्या अधिकाऱ्याचा सत्कार करावा अशी सूचना केली.
https://www.prahaar.in/2026/10/09/deadline-for-voter-registration-is-only-until-october-12-special-camps-to-be-organized-across-the-state-on-october-10-and-11/
काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी वायू प्रदुषण निर्देशांक १५० वर पोहोचलेला असताना यासाठी टँकरद्वारे पाणी वापरणार असतील तर याचे पाणी कुठून आणणार असा सवाल केला. तर विहिरी स्वच्छ करण्यासाठी निधी नाही असे सांगत सन २०२४ व सन २०२५मध्ये अशाप्रकारे रस्ते धुण्याने किती फरक पडला असा सवाल केला. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी पाणी टंचाई आहे आणि दुसरीकडे न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळीचे प्रदुषण रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी सांडपाण्याचा वापर केला जाणार का? त्यामुळे यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जावी अशी सूचना केली. उबाठाचे यशोधर फणसे यांनी रस्ते पाण्याने धुण्याऐवजी रस्त्यावरील धुळ शोषून घेणाऱ्या यंत्राचा वापर केला जावा अशी सूचना केली. तर यामिनी जाधव यांनी आपल्या प्रभागात तेल मिश्रित पडदे लावले जावेत,जेणेकरून त्याला लागून धुळ त्याला चिकटली जाईल. हे पडदे धुतले जातात. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर आपल्या प्रभागात हा उपक्रम रावबला जावा अशी सूचना केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी धुळीचे प्रदुषण कमी करण्यासाठी बांधकाम आणि प्रकल्प कामांच्या ठिकाणी विकासक आणि कंत्राटदारांना ५०० मीटर परिक्षेत्राची स्वच्छता राखून निगा राखणे बंधनकारक आहे, त्याऐवजी १००० ते १५०० चौरस मीटरचे परिक्षेत्र करावे जेणेकरून जास्तीत जास्त रस्ते त्यात कव्हर होतील अशी सूचना केली.
https://www.prahaar.in/2026/10/09/sewage-tunnel-break-through-successfully-achieved-at-the-don-bosco-school-junction-in-borivali-90-of-the-project-work-is-complete/
मागील वर्षीच्या टँकर सेवेची चौकशी करा
भाजपचे तेजिंदर सिंग तिवाना यांनी मागील वर्षी प्रशासक काळामध्ये टँकरच्या पाण्याद्वारे रस्ते धुतले, त्यावेळी टँकरच्या प्रत्येक फेऱ्याच्या तुलनेत यंदाचा दर हा निमपट आहे. त्यामुळे मागील वर्षी जास्त पैसे मोजल्यामुळे याची दक्षता विभागामार्फत चौकशी केली जावी अशी सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत जमीर कुरेशी आदींनी भाग घेत या प्रस्तावाला विरोध केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रदुषण कमी करण्यासाठी अन्य पर्यायाचा विचार केला जावा अशी सूचना करत अशाप्रकारे रस्ते टँकरच्या पाण्याद्वारे धुणे हे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. यासाठी यांत्रिक झाडूच्या माध्यमातून धुळ शोषून घेवू शकतो किंवा अन्य काही पर्याय आहे का याचा विचार केला जावा. पण टँकरद्वारे रस्ते धुणे हे योग्य नसून यासाठी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात येत असल्याचे जाहीर केले.