Home एक्सक्ल्युजिव्ह MPSC Students News : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच दिलासादायक निर्णय?

MPSC Students News : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच दिलासादायक निर्णय?

0
MPSC Students News : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच दिलासादायक निर्णय?

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षार्थींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे जाणवल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.

https://www.prahaar.in/2026/10/09/complete-the-work-on-the-ghatkopar-sewage-treatment-plant-within-the-stipulated-timeframe-additional-commissioner-projects-abhijit-bangar-conducts-an-inspection/

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, शुक्रवारी या आंदोलनाचा नववा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबर रोजी आंदोलनस्थळी भेट दिली होती. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली.

नोकरीच्या शोधात स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंबापासून दूर राहून मेहनत करणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मनाला वेदना होतात, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली असून, ते सकारात्मक असल्याचे जाणवल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात दिलासादायक निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने आंदोलन सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमधील चर्चेनंतर सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here