वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांच्या केलिकुंज आश्रमावरून सध्या एक नवा वाद उफाळून आला आहे. श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे अध्यक्ष फलाहारी महाराज (दिनेश शर्मा) यांनी एक खळबळजनक दावा करत आरोप केला होता की, प्रेमानंद महाराजांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला (Virat Kohali) तब्बल ५ कोटी रुपये देऊन आश्रमात आणण्यात आले होते. राजस्थानमधील एका कंपनीने अथवा बिल्डर लॉबीने हा सर्व खर्च केला होता, असा दावा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांना लिहिलेल्या पत्रात केला.
विराट कोहलीच्या टीमकडून आरोपांचे खंडन

फलाहारी महाराजांच्या या खळबळजनक दाव्यानंतर आता विराट कोहलीच्या बाजूने अधिकृत स्पष्टीकरण समोर आले आहे. विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी एक विशेष निवेदन जारी करत हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “फलाहारी महाराज यांनी केलेले सर्व दावे पूर्णपणे असत्य, निराधार आणि काल्पनिक आहेत. विराट कोहली हे केवळ आणि केवळ प्रेमानंद महाराजांबद्दल असलेल्या अथांग श्रद्धेपोटी व आदरापोटी त्यांची भेट घेण्यासाठी आश्रमात जातात,” असे स्पष्टीकरण निवेदनात देण्यात आले आहे. तसेच प्रसारमाध्यमांनी अशा कोणत्याही अफवांची किंवा दाव्यांची शहानिशा केल्याशिवाय बातम्या प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहनही विराटच्या टीमने केले आहे.
पत्रात झेड प्लस सुरक्षेची मागणी
https://www.prahaar.in/2026/10/07/actress-kunika-sadanands-mother-passes-away-breathes-her-last-at-the-age-of-83/
फलाहारी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असाही आरोप केला आहे की, ज्या गटाने किंवा बिल्डर लॉबीने ५ कोटी रुपये खर्च केले होते, तेच लोक आता प्रेमानंद महाराजांच्या नावाचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार करत आहेत. या सर्व बाबींमुळे आश्रमात तणावाचे वातावरण असून प्रेमानंद महाराजांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ (Z+) सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी फलाहारी महाराजांनी केली आहे.
शिष्याच्या आत्महत्येनंतर संशयाचे जाळे अधिक गढूळ
दुसरीकडे, केलिकुंज आश्रमातील हे वादळ शमण्याचे नाव घेत नसून, २५ सप्टेंबर रोजी प्रेमानंद महाराजांचे शिष्य दीपक कुमार उर्फ रसिक दुलारी शरण यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या आत्महत्येनंतर हे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. रसिक दुलारी यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांच्या खुणा आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण आश्रमात सध्या मोठा गोंधळ आणि खळबळ उडाली आहे.