Home एक्सक्ल्युजिव्ह शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारची टीम घेणार दुष्काळी भागाचा आढावा

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारची टीम घेणार दुष्काळी भागाचा आढावा

0
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारची टीम घेणार दुष्काळी भागाचा आढावा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारची टीम घेणार दुष्काळी भागाचा आढावा (Photo: Devendra Fadnavis X Account)

दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक उद्यापासून म्हणजेच 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच राज्यातील दुष्काळ स्थितीबाबत त्यांना माहिती दिली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘आपण जो काही प्रस्ताव पाठवला आहे त्याची माहिती देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेलो होतो. त्या प्रस्तावाची प्रतदेखील अमित शाह यांना दिली आहे. मी त्यांना सांगितलं की, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या देखील तयार होणार आहे. चाऱ्याची समस्यादेखील तयार होणार आहे. जवळपास 32 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघायला मिळत आहे आणि आपण विचार केला तर 80 टक्के तालुके हे दुष्काळाने पूर्णपणे प्रभावित पाहायला मिळतात. केंद्र सरकारने महाराष्ट्राला विशेष मदत करावी. आम्ही जो प्रस्ताव पाठवतोय त्या संदर्भात तात्काळ केंद्राची टीम यावी, अशाप्रकारची विनंती त्यांना केलेली आहे.’ या भेटीनंतर केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासूनच राज्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे.

या दौऱ्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई तसेच संबंधित बाबींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. केंद्रीय पथकातील अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तीन पथकांद्वारे विविध भागांची पाहणी केली जाणार आहे. दुष्काळ पाहणीसाठी 11 सदस्यांचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा , अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि इतर संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाचे नेतृत्व मुक्तानंद अग्रवाल, संयुक्त सचिव (पीक विमा), कृषी व शेतकरी कल्याण विभाग करीत आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/07/new-direction-for-port-development-in-maharashtra-minister-nitesh-rane-inspects-krishnapatnam-adani-port/

पाहणीसाठी पथकाचे तीन गट करण्यात आले आहेत. पथक एक पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर पुणे जिल्ह्यात; पथक दोन मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांना भेट देणार आहे. पथक तीन विदर्भातील नागपूर, यवतमाळ जिल्हा आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय साधत होणाऱ्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय स्तरावरील वास्तव अधिक स्पष्टपणे समोर येण्यास मदत होणार आहे. जिल्हानिहाय अंतिम कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर पथकाच्या भेटींचे नियोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here