Home ब्रेकिंग न्यूज नीती आयोगाच्या ‘डेल्टा रँकिंग’मध्ये गडचिरोली देशात प्रथम

नीती आयोगाच्या ‘डेल्टा रँकिंग’मध्ये गडचिरोली देशात प्रथम

0
नीती आयोगाच्या ‘डेल्टा रँकिंग’मध्ये गडचिरोली देशात प्रथम

मुंबई : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीतील कामगिरीच्या आधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात आली असून जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या या कामगिरीचे अभिनंदन केले.

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विविध विकास निर्देशांकांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जिल्ह्यांची तिमाही कामगिरी तपासली जाते. जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आरोग्य, शिक्षण, कृषी, जलसंधारण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आदी क्षेत्रांतील प्रगतीच्या आधारे ही क्रमवारी निश्चित केली जाते. गडचिरोलीने विशेषतः शेती आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यात सहा हजार जलसाठे तयार करण्यात आले. त्याचा शेती आणि जलसंधारणाच्या कामांना हातभार लागला आहे.

https://www.prahaar.in/2026/10/07/rbi-announces-repo-rate-find-out-exactly-what-it-is/

शिक्षणाच्या क्षेत्रात शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहांची संख्या वाढविण्यात आली. आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने बँक खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले. कौशल्य विकासासाठी आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून महिंद्रा, लॉईड्स आणि टाटा ट्रस्ट यांसारख्या संस्थांनी या उपक्रमांना हातभार लावला. आरोग्य क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संबंधित कामे तसेच गर्भवती महिलांना सकस आहार उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना राबविण्यात आल्या. विविध विकास निर्देशांकांमध्ये झालेल्या या प्रगतीमुळे गडचिरोलीला तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये देशात अव्वल स्थान मिळाले.

गडचिरोलीतील प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिक यांच्या सहभागामुळे ही कामगिरी साध्य झाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. या सर्वांचे अभिनंदन करत विकासाच्या कामात असेच टप्पे गाठत राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here