Home ब्रेकिंग न्यूज Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनो, स्थगितीचा काळ मराठी शिकण्यासाठी वापरा; 18 ऑगस्ट 2027 नंतर नियमांची अंमलबजावणी

Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनो, स्थगितीचा काळ मराठी शिकण्यासाठी वापरा; 18 ऑगस्ट 2027 नंतर नियमांची अंमलबजावणी

0
Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनो, स्थगितीचा काळ मराठी शिकण्यासाठी वापरा; 18 ऑगस्ट 2027 नंतर नियमांची अंमलबजावणी

मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहनचालकांनी मराठी भाषा शिकावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात’ सहभागी होऊन व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ या अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला परिवहन विभागाचे अधिकारी, मराठी भाषा विभागाचे अधिकारी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी तसेच राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.  (Pratap Sarnaik )

https://www.prahaar.in/2026/10/06/nashik-accident-tragedy-strikes-early-morning-on-the-yeola-nandgaon-road-eicher-vehicle-rams-into-a-truck-two-dead/

 

‘संवाद सोपा व्हावा’

प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सोपा व्हावा, या उद्देशाने परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवले जात आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरात 180 हून अधिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली होती. सुमारे 1,800 शिक्षकांच्या माध्यमातून 1 लाख 65 हजार 800 हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राज्यात सुमारे 9 लाख 78 हजार रिक्षा आणि टॅक्सी चालक कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे 9 लाख 16 हजार ऑटोरिक्षा चालक आणि 61 हजार टॅक्सी चालकांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेशात 4 लाख 40 हजार 238 रिक्षाचालक आणि 43 हजार 106 टॅक्सीचालक आहेत.

अभियानाचा दुसरा टप्पा

अनेक अमराठी चालक अद्याप मराठी प्रशिक्षणापासून दूर आहेत. त्यामुळे अभियानाचा दुसरा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशिक्षण केंद्रांसोबतच ऑनलाइन माध्यमातूनही व्यावहारिक मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दरम्यान, व्यावहारिक मराठीसंदर्भातील सुधारित नियमांच्या अंमलबजावणीला 18 ऑगस्ट 2027 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, नियम रद्द झालेले नाहीत. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी शिकण्यासाठी करावा आणि नियमांची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

स्थानिक शाळा किंवा उपलब्ध जागांचा वापर करून प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here