Home ब्रेकिंग न्यूज ‘गर्जना मोर्चा नव्हे ही तर कोल्हेकुई’ – ॲड. आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

‘गर्जना मोर्चा नव्हे ही तर कोल्हेकुई’ – ॲड. आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

0
‘गर्जना मोर्चा नव्हे ही तर कोल्हेकुई’ – ॲड. आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आरोप करायचे, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. आजचा मोर्चा हा ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीला साजेसा कोल्हेकुई मोर्चा होता, अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज असलेल्या जागतिक प्राणी दिनाचा संदर्भ देत ॲड. शेलार म्हणाले की, आजचा मोर्चा पाहिल्यानंतर त्याचे नाव ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्हे कुईचा मोर्चा’ असायला हवे, असे वाटते.

निवडणुकीत स्वतःला यश मिळाले तर सर्व काही योग्य आणि दुसऱ्यांना विजय मिळाला तर निवडणूक प्रक्रिया चुकीची, अशी विरोधकांची भूमिका आहे. ज्ञानेशकुमार निवडणूक आयुक्त झाल्यानंतर झालेल्या सहा निवडणुकांचा संदर्भ देत शेलार म्हणाले की, या सहा निवडणुकांपैकी तीन ठिकाणी भाजप किंवा एनडीएला यश मिळाले, तर केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे गैर-भाजप पक्षांची सरकारे सत्तेवर आली. पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममध्ये भाजपला यश मिळाले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करण्यामागे कोणतेही तथ्य नाही. हा तथ्यहीन आणि लबाडीचा आरोप आहे.

‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’ अशी विरोधकांची मानसिकता झाली आहे. हा वैचारिक गोंधळ आहे. निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्यापेक्षा जनतेचा कौल स्वीकारण्याची गरज आहे, असे शेलार यांनी सुनावले. महाराष्ट्रात विधानसभा फेरनिवड घ्या असे आज विरोधक म्हणत आहेत त्यांना हे माहीत नाही का? ज्ञानेश कुमारांची नियुक्ती होण्याआधीच महाराष्ट्राच्या निवडणूक झाल्या आहेत. त्यामुळे एकूण विरोधकांचे आक्षेपच हास्यास्पद आहेत. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही शेलार यांनी सुनावले. २००७ आणि २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुका ईव्हीएमवर झाल्या आणि त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यश मिळाले. २०१७ मध्येही ईव्हीएमच्या माध्यमातून महापालिकेतील सत्ता मिळाली. मग स्वतःचा विजय ईव्हीएमवर झाला तेव्हा तो योग्य आणि इतरांचा विजय झाला की ईव्हीएम चुकीचे, असा सवाल शेलार यांनी केला.

https://www.prahaar.in/2026/10/03/pune-teachers-constituency-finally-goes-to-bjp-seat-sharing-deadlock-within-mahayuti-resolved/

२००९ मध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले तेही ईव्हीएमच्या माध्यमातूनच. त्यामुळे ईव्हीएमबाबत आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय इतिहासाकडेही पाहावे. आपण निवडून आलो तर ईव्हीएम चांगले आणि इतर निवडून आले तर ईव्हीएममध्ये घोटाळा, ही भूमिका जनतेला मान्य होणार नाही, असे शेलार म्हणाले. मुळात ईव्हीएम आणण्याचा निर्णयच काँग्रेसने केला. त्यानंतर काँग्रेस काळात निवडणूका झाल्या, काँग्रेस जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगले होते, मग आज भाजपा जिंकल्यावर ईव्हीएम नको? असा सवाल त्यांनी केला.

एसआयआरमुळे मतदार यादी अधिक सुरक्षित

एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादी अधिक शुद्ध आणि सुरक्षित होणार आहे. 90 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांचीही पडताळणी केली जात आहे. त्यामुळे एसआयआरबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधकांनी करू नये, असे आवाहन शेलार यांनी केले. राज ठाकरे आज एसआयआर रद्द करा, अशी मागणी करीत आहेत. पण त्यांना आठवत नसेल 15 ऑक्टोबर 2025 ला त्यांनीच मागणी केली होती की, मतदार यादीतील वयाच्या नोंदी मध्ये विसंगती आहेत. तर 19 ऑक्टोबर 2025 ला ते म्हणाले होते की, 96 लाख बोगस मतदारांनी मतदार यादी मध्ये आहेत. त्यामुळे याद्या स्वच्छ करा, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका. 1 नोव्हेंबर 2025 उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता. दुबार मतदार यादी आणि कागदपत्रांच्या पडताळणीची मागणी केली होती. 4 नोव्हेंबर 2025 ला आयोगाकडे याचीच मागणी केली की, दुबार मतदारांवर कारवाई करा. 15 जानेवारी 2026 ला राज ठाकरे यांनी आरोप केला की, 10 लाख दुबार मतदार आहेत त्यांच्यावर कारवाई करा, मग आज आयोगाने कारवाई केली. याद्या स्वच्छ केल्या तर यांना त्रास का होतोय? असा सवाल मंत्री शेलार यांनी केला.

मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीची ही अमूल्य देणगी भारतीय जनता जपत आहे. मतदार सजग आहे, तो मतदान करतो आणि आपला कौल देतो. त्यामुळे जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रडगाणे गाणाऱ्या विरोधकांचा हा ‘रडक्यांचा मोर्चा’ आहे, अशी बोचरी टीकाही शेलार यांनी केली. निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि एसआयआरविरोधातील मोर्चातील मागण्या, भाषणे आणि भूमिका यामध्ये तथ्याचा अभाव आहे. त्यामुळे या मोर्चाचे वर्णन ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ यापेक्षा वेगळे करता येणार नाही, असा टोला ॲड. आशिष शेलार यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here