बेलापूरमध्ये घडलेली घटना एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. नवी मुंबईतील बेलापूर रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यातून दोन महिला आरोपींनी असा पळ काढला की सगळेच थक्क झाले. अंगावरील साड्यांचा दोरखंड तयार करून कोठडीतून २ महिला आरोपी पसार झाल्या. यामुळे आता रेल्वे सुरक्षा दलाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जुईनगर रेल्वेस्थानकातील गोदामातून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर चोरी केल्याच्या आरोपाखाली बेलापूर रेल्वे सुरक्षा दलाने २६ सप्टेंबर रोजी जालन्याची रुपाली कुऱ्हाडे या ३० वर्षीय महिलेला आणि भिवंडीच्या शालीबाई पवार या ४० वर्षीय महिलेला ताब्यात घेतले होते. २७ सप्टेंबरला या दोघींना सीएसएमटी येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत आरपीएफ कोठडी सुनावली होती. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना या दोन कैदी महिलांनी लॉकअपमधून बाहेर पडण्याचा प्लॅन आखला. सुरुवातीला कोठडीकडे कुणाचं लक्ष नाही याची खात्री पटल्यावर संधीचं सोनं करत त्यांनी गजांमधून हात बाहेर काढत लॉकअपला असलेलं कुलूप हिसकावून तोडलं. यानंतर त्यांनी दरवाजाची कडी उघडली. आश्चर्याची बाब म्हणजे एवढं सगळं घडत असताना कोणाचंही लक्ष त्या लॉकअपकडे गेलं नाही. त्यानंतर बाहेर आल्यावर दोघीनी ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बाल्कनीकडे धाव घेतली. तिथे असलेल्या जनरेटरला अंगावरील साड्यांचे टोक घट्ट बांधून एक दोर तयार केला. या दोरांच्या मदतीने त्या पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून खाली उतरल्या आणि क्षणात फरार झाल्या.
https://www.prahaar.in/2026/10/03/india-crushed-pakistan-at-the-2026-asian-games-clinching-the-gold-medal-for-the-second-consecutive-time/
हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा रात्रपाळीसाठी असलेली महिला पोलीस कर्मचारी काही वेळेसाठी बाथरूमला गेली असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ठाणे अंमलदाराच्या हा प्रकार लक्षात आला आणि कोठडीत त्या दोन कैदी महिला दिसल्या नाहीत तेव्हा पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच त्वद्रूत आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरु केली. घटनेच्या दिवशी सकाळी पावणेनऊ वाजता रुपाली कुऱ्हाडे हिला नेरुळ रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. परंतु तिची सहकारी शालीबाई पवार हिचा शोध पोलीस घेत आहेत.