Home ब्रेकिंग न्यूज आंबा-काजू उत्पादकांसाठी एआय आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प – मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

आंबा-काजू उत्पादकांसाठी एआय आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प – मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

0
आंबा-काजू उत्पादकांसाठी एआय आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प – मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू पिकांना बसणारा फटका कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. आंबा-काजू उत्पादकांसाठी एआय आधारित ‘स्मार्ट शेती’च्या प्रायोगिक प्रकल्पाचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. हवामान, पिकांची स्थिती, मातीतील ओलावा तसेच संभाव्य किडी-रोगांची पूर्वसूचना यासंबंधी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दीड-दोन वर्षांत बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू या प्रमुख फळपिकांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातून शेतीविषयक निर्णय अधिक अचूक आणि वेळेत घेता यावेत, तसेच उत्पादनात स्थैर्य आणता यावे, या उद्देशाने हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात बागांमध्ये ओलावा संवेदक (मॉइश्चर सेन्सर), स्वयंचलित हवामान केंद्र (एडब्ल्यूएस), माती परीक्षण आणि आंबा-काजू बागांचे उपग्रहाद्वारे मॅपिंग करण्यात येणार आहे. या माध्यमातून संकलित होणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून प्रत्येक क्षेत्राच्या गरजेनुसार नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे बागेतील परिस्थितीनुसार पाणी, अन्नद्रव्ये आणि इतर व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना आवश्यक सूचना मिळू शकतील.

https://www.prahaar.in/2026/10/03/pune-teachers-constituency-finally-goes-to-bjp-seat-sharing-deadlock-within-mahayuti-resolved/

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक डॉ. विवेक भोईटे तसेच बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बाळासाहेब कृषी केंद्र, दापोलीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

किडी-रोगांची पूर्वसूचना मिळणार

या प्रकल्पाविषयी माहिती देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, आंबा-काजू बागांमधील झाडांची वाढ, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन आणि पाणी नियोजन याबाबत अधिक अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर हवामान आणि पिकांच्या स्थितीतील बदलांच्या आधारे संभाव्य किडी व रोगांची पूर्वसूचना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपाययोजना करणे शक्य होईल. एआयच्या मदतीने मिळणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांचे शेतीविषयक निर्णय अधिक सुलभ आणि अचूक होतील. त्यातून उत्पादन खर्चाचे नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि पिकांचे संरक्षण याला मदत होऊन शाश्वत आणि सुरक्षित उत्पादनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. जिल्ह्याच्या शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने हा प्रायोगिक उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here