Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकडून सप्तशृंग गडासह परिसरातील विविध धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांना भेट दिली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सप्तशृंग गडासाठी स्वतंत्र आणि सर्वंकष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंग गड येथे कुंभमेळा २०२७ पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत गडाची भौगोलिक रचना, वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, भाविकांची सुरक्षित ये-जा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांचा आढावा घेण्यात आला.
वाढीव गर्दीचा विचार करून मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना
सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. स्थानिक प्रशासनाला गर्दी व्यवस्थापनाचा अनुभव असला तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात संभाव्य वाढीव गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून ठेवावी, अशा सूचना शेखर सिंह यांनी दिल्या. गड परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बसस्थानक, शटल सेवा आणि खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
कचरा व्यवस्थापनासाठी बेसलाइन डेटा तयार करणार
कुंभमेळ्याच्या कालावधीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन सध्याच्या कचरा निर्मितीचा बेसलाइन डेटा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अतिरिक्त मनुष्यबळ, डस्टबिन, कचरा संकलन वाहने, तात्पुरती साठवणूक व्यवस्था आणि कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यांचे नियोजन केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार तात्पुरती कचरा प्रक्रिया व्यवस्था उभारण्याची शक्यताही तपासली जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/10/02/12-day-special-block-on-asangaon-kasara-railway-line-many-express-trains-affected/
निर्माल्यापासून अगरबत्ती, धूपबत्ती निर्मितीवर भर
गडावर मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या निर्माल्यापासून अगरबत्ती, धूपबत्ती यांसारखी उत्पादने तयार करणाऱ्या संस्था आणि स्टार्टअप्सशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सामाजिक दायित्व निधी (CSR) किंवा उपलब्ध इतर निधीतून आर्थिक स्रोत उभारण्याची शक्यता तपासण्याचे निर्देशही देण्यात आले.
पाणी आणि स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था
सिंहस्थ काळात वणी, नांदुरी आणि सप्तशृंग गड परिसरात पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी तात्पुरती तसेच मोबाईल स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भाविकांना केवळ सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना चांगला आणि आध्यात्मिक अनुभव मिळेल, याचा विचार करून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
गड परिसरात ९ पायाभूत सुविधांची कामे प्रस्तावित
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सप्तशृंग गड परिसरातील पायाभूत सुविधांसाठी ९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग गडासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत पंचायत समिती स्तरावरही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/02/fodder-crisis-in-nashik-shadow-of-fodder-crisis-looms-over-nashik-drought-makes-livestock-fodder-a-critical-issue/
गडावर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा विचार
सप्तशृंग गड ट्रस्टच्या स्तरावर गडावर प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था उभारण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती न्या. विवेक सोनुने यांनी दिली. नांदुरी येथे सुरू असलेल्या नियमित आरोग्य व्यवस्थेच्या धर्तीवर ही सुविधा विकसित करण्याचा विचार आहे. कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने संभाव्य आरोग्यविषयक परिस्थिती लक्षात घेऊन पुढील दोन वर्षांत या सुविधेसाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, उपवनसंरक्षक राकेश सेपट, ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, नियोजन उपायुक्त योगेंद्र चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तहसीलदार रोहिदास वारुळे आदी उपस्थित होते.