Home ब्रेकिंग न्यूज Sindhudurg News : सिंधुदुर्गातील 7 ठिकाणी चक्रीवादळाची रंगीत तालीम; आपत्ती यंत्रणांची तयारी तपासली

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील 7 ठिकाणी चक्रीवादळाची रंगीत तालीम; आपत्ती यंत्रणांची तयारी तपासली

0
Sindhudurg News : सिंधुदुर्गातील 7 ठिकाणी चक्रीवादळाची रंगीत तालीम; आपत्ती यंत्रणांची तयारी तपासली

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये संयुक्त चक्रीवादळ रंगीत तालीम घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 7 आपत्तीप्रवण ठिकाणी विविध यंत्रणांची तयारी आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची क्षमता तपासण्यात आली.

तारकर्ली, आचरा, रेडी पोर्ट, श्रीरामवाडी, शेळपी, विजयदुर्ग आणि तांबळडेग या ठिकाणी ही तालीम घेण्यात आली. यावेळी मुसळधार पाऊस, जोरदार वारे, समुद्र खवळणे, पूर, जमिनीची धूप, झाडे पडणे, विजेचे खांब कोसळणे तसेच रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होणे अशा परिस्थिती निर्माण करण्यात आल्या.

https://www.prahaar.in/2026/10/01/first-1000-days-mission-child-development-devendra-fadnavis/

चक्रीवादळ जिल्ह्यात धडकले असल्याची काल्पनिक परिस्थिती तयार करण्यात आली. भारतीय हवामान विभागाकडून इशारा मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा आपत्कालीन नियंत्रण केंद्रही सक्रिय करण्यात आले.

या तालमीत महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, परिवहन, बंदरे, ग्रामविकास, नगरपंचायत, मत्स्य विभाग आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डासह विविध विभाग सहभागी झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, गृह रक्षक दल, एनसीसी, एनएसएस, आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेतला.

आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राहावा आणि नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी या तालमीचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या जिओ-डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून आपत्तीच्या वेळी उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घेण्याची क्षमता तपासण्यात आली.

अशा तालमींमुळे भविष्यात चक्रीवादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिक, पशुधन आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान कमी करण्यास मदत होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here