छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील गुन्हेगारी आणि अपघातांच्या घटनांमध्ये पुन्हा एका गंभीर घटनेची भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कच्ची घाटी परिसरातील समृद्धी महामार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी धावत्या वाहनातून मृतदेह महामार्गावर फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासासाठी तो शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मृताच्या कपड्यांवरून आणि त्याच्याकडे आढळलेल्या वस्तूंवरून तो महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्यातील असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. यासाठी आसपासच्या पोलीस ठाण्यांसह महामार्गावरील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात आहे.
https://www.prahaar.in/2026/10/02/breaking-news-actor-dino-morea-arrested-in-connection-with-the-mithi-river-irregularities-case/
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात
दरम्यान, संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच जवळच्या टोल नाक्यांवरील वाहनांच्या नोंदीही तपासल्या जात आहेत. या प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. प्रेमप्रकरण, जुने वैमनस्य किंवा लुटमारीचा हेतू यांसह विविध शक्यतांचा तपास केला जात आहे.
समृद्धी महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पोलिसांच्या तपासातून मृत व्यक्तीची ओळख आणि या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.