Home ब्रेकिंग न्यूज RSS News : संघ नसता तर डाव्यांनी संविधान, लोकशाही केव्हाच संपवली असती!

RSS News : संघ नसता तर डाव्यांनी संविधान, लोकशाही केव्हाच संपवली असती!

0
RSS News : संघ नसता तर डाव्यांनी संविधान, लोकशाही केव्हाच संपवली असती!

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थात संघाचे मोठे योगदान

मुंबई : ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता, तर वामपंथी विचारांनी देशाचे संविधान आणि लोकशाही केव्हाच संपवली असती. अनेक वामपंथी देशांमध्ये ज्या प्रकारची व्यवस्था आहे, ती भारतातही आली असती. त्यामुळे भारत पुन्हा विचारांच्या गुलामीकडे गेला असता,’’ असे परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. एका हिंदी साप्ताहिकाच्या वतीने हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे आयोजित ‘सुशासन संवाद’ कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत त्यांनी संघाच्या शताब्दीच्या प्रवासासह छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इतिहासलेखन, आर्यन इन्व्हेजन थिअरी आणि महाराष्ट्रातील भाषेच्या प्रश्नावरही भाष्य केले.

देशात सध्या दिसत असलेल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाला आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित सामाजिक रचनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे योगदान असल्याचे फडणवीस म्हणाले. आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांनी इतिहासाचा अभ्यास करून हिंदू समाज जेव्हा कमजोर आणि विभाजित झाला, तेव्हा देश पारतंत्र्यात गेल्याचे लक्षात घेतले. त्यातून संघाने व्यक्तिनिर्माणाचे काम सुरू केले. राष्ट्रवादाने प्रेरित व्यक्तीने जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात काम केले, तरी देशाची प्रगती आणि जगात भारताचे स्थान उंचावणे हे अंतिम उद्दिष्ट असावे, अशी विचारधारा संघाने रुजवण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस म्हणाले.

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन झाले नसल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. इंग्रजांना भारताचे शौर्य, तेज आणि ओज संपवायचे होते. त्यामुळे देशातील नायकांचा इतिहास दडपण्याचे आणि तो चुकीच्या पद्धतीने मांडण्याचे काम ब्रिटिशांनी केले. स्वातंत्र्यानंतर देशाचा खरा इतिहास समोर येईल, अशी अपेक्षा होती; मात्र काँग्रेसने वामपंथी आणि ‘चाटुकार’ इतिहासकारांना पाठ्यपुस्तकांमध्ये इतिहासलेखनाची संधी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

https://www.prahaar.in/2026/10/01/mrpl-blast-mangalurumassive-explosion-at-mrpl-plant-in-mangaluru-one-dead-9-injured/

‘‘किमान ५० वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मुघल साम्राज्यावर अनेक पाने होती; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका परिच्छेदात संपवण्यात आला,’’ असे फडणवीस म्हणाले. केंद्रातील विद्यमान सरकारने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केल्याचे सांगत, ‘‘आता मुघलांचा इतिहास दोन पानांमध्ये आला आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदू पदपादशाहीचा इतिहास १७ पानांमध्ये शिकवला जात आहे. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कोणी छेडछाड करू शकत नाही,’’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाषा ही संवादाचे माध्यम, वादाचे नव्हे!

– भाषेच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी भाषा ही संवादाचे माध्यम असावे, वादाचे माध्यम नव्हे, अशी भूमिका मांडली. २०१४ पासून भाजप किंवा महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर कोणावर अन्याय केला नसल्याचे ते म्हणाले. काही पक्ष मात्र फक्त भाषेच्या आधारावर राजकारण करू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले.
– प्रादेशिक अस्मितेचा आणि प्रत्येक मातृभाषेचा सन्मान झाला पाहिजे; त्याचबरोबर सर्व भारतीय भाषांचाही आदर केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य राहील; मात्र अन्य भाषा बोलणाऱ्या व्यक्तींवर ती भाषा वेगळी आहे म्हणून अन्याय केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
– आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्याची किमान कामचलाऊ भाषा आपल्याला आली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रात भाजपचे सरकार असेपर्यंत मराठीला सर्वोच्च सन्मान राहील; त्याचबरोबर सर्व भारतीय भाषांचाही सन्मान केला जाईल. ‘‘मराठी आपली आई असेल, तर बाकीच्या भाषा आपल्या मावश्या असतील,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here