Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra politics : भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेत दाखल; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट

Maharashtra politics : भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेत दाखल; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट

0
Maharashtra politics : भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेत दाखल; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट
भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेत दाखल; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट(Photo:Prahaar.in)

 जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याचे उट्टे काढणार?

मुंबई : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील उबाठा गटाचे संपर्कप्रमुख असलेल्या शेखर गोरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.(District Bank Election)

शेखर गोरे पक्षप्रवेशानंतर भाषणात म्हणाले, ‘‘मला शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जेवढी शिवसेना वाढवायची आहे, तेवढी मी सातारा जिल्ह्यात नक्की वाढवून देईन.’’ यावर ‘‘तुम्ही तुमचा शब्द खरा करा, मी तुम्हाला दिलेला शब्द नक्की पूर्ण करेन,’’ असे सांगत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिंदे यांनी शेखर गोरे यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना, त्यांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही दिली. शेखर गोरे यांना लोकांना न्याय द्यायचा असल्याने त्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला असल्याचे शिंदे म्हणाले. त्यांच्या प्रवेशामुळे माण-खटाव भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशाला सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणातील मागील वादाचीही पार्श्वभूमी आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांना शह दिल्याचे चित्र निर्माण झाले होते. या प्रक्रियेदरम्यान पोलिसांकडून मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते.(District Bank Election)

जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी दोन सदस्यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडला असला, तरी या घडामोडींमुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक राजकीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशाकडे पाहिले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/09/30/navratri-health-awareness-drive-chief-minister-health-dialogue-youth/

दरम्यान, शेखर गोरे हे दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघात जयकुमार गोरे यांच्या विजयासाठी त्यांनी काम केले होते. त्यानंतर विधान परिषदेवर संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा होती. मात्र, अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यांनी उबाठा प्रवेश केला. ते साध्य सातारा जिल्ह्यातील संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. आता त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने माण-खटावसह सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडीचा परिणाम काय होतो, याकडे लक्ष लागले आहे.(District Bank Election)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here