Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Manhole Accident : सांताक्रुझमध्ये मॅनहोलमध्ये उतरलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू

Mumbai Manhole Accident : सांताक्रुझमध्ये मॅनहोलमध्ये उतरलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू

0
Mumbai Manhole Accident : सांताक्रुझमध्ये मॅनहोलमध्ये उतरलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू

दुसरा कामगार आयसीयूमध्ये दाखल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : साकीनाका येथे मॅनहोलची दुर्घटना घडून अस्लम शेख नावाच्या एका व्यक्तीचा बळी गेल्याच्या घटनेला तीन महिने उलटत नाही तोच सांताक्रूझ (पूर्व) गोळीबार रोड क्रमांक ८ येथे एका खासगी गृहनिर्माण संस्थेमार्फत सफाई काम करताना दोन कामगार मॅनहोलमध्ये पडल्याची घडल्याची घटना झाली आहे. त्यातील एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सांताक्रूझ (पूर्व), गोळीबार रोड क्रमांक ८ येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास एका गृहनिर्माण संस्थेच्या मार्फत गटार साफसफाईचे काम खासगी सफाई कामगारांना देण्यात आले होते. मात्र सफाई काम करताना या दोन कामगार हे तेथील मॅनहोलमध्ये पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. त्यांनी या मॅनहोलमध्ये पडलेल्या दोन सफाई कामगारांना बाहेर काढले आणि त्यांना तातडीने नजीकच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून एका कामगाराला मृत घोषित केले. तर दुसऱ्या कामगाराला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मात्र ही घटना का आणि कशी काय घडली, त्याची कारणे काय याबाबत स्थानिक पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासन यांच्याकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी त्या दोन कामगारांचा वापर करून मॅनहोल परस्पर उघडल्याने आणि त्यामध्ये दोन कामगार उतरल्याने आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने संबंधित सोसायटी अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या कामासाठी विलास जाधव नावाची व्यक्ती ठेकेदार म्हणून कार्यरत होती. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, विलास जाधव हे मुंबई महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. मॅनहोलजवळील भव्य निकेतन इमारतीतील काही रहिवाशांनी विलास जाधव यांना मॅनहोलच्या सफाईचे काम करण्यास सांगितले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता खासगी ठेकेदारामार्फत मॅनहोलची सफाई का करण्यात आली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, घटनेनंतर वाकोला पोलिसांनी ठेकेदार विलास जाधव यांना ताब्यात घेतले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. संतोष काष्टे यांच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. या दुर्घटनेमुळे मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मॅनहोलच्या सफाईचे काम नेमके कोणाच्या निर्देशानुसार देण्यात आले होते? कामादरम्यान सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? तसेच या दुर्घटनेस जबाबदार कोण, याचा उलगडा तपासातून होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here