Home ब्रेकिंग न्यूज Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाची ओढ कायम; राष्ट्रीय पातळीवर पर्जन्यमानात सुधारणा

Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाची ओढ कायम; राष्ट्रीय पातळीवर पर्जन्यमानात सुधारणा

0
Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाची ओढ कायम; राष्ट्रीय पातळीवर पर्जन्यमानात सुधारणा

राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाची तूट कायम असून 28 सप्टेंबरअखेरीस ही तूट 18 टक्क्यांवर पोहोचली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील काही भागांत पावसाने जोर धरला. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र, राज्याच्या एकूण पावसाच्या तुटीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे 31 ऑगस्टअखेरीस महाराष्ट्रातील पावसाची तूट 12 टक्के होती. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ही तूट 16 टक्क्यांवर पोहोचली. आता 28 सप्टेंबरपर्यंत ती 18 टक्क्यांवर गेली आहे. 30 सप्टेंबरला मान्सूनचा कालावधी अधिकृतपणे संपतो. त्यामुळे 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीतील पावसाचीच मान्सूनच्या एकूण पावसासाठी नोंद घेतली जाते.

हवामानामुळे निर्माण झालेल्या प्रणालीचा देशाला फायदा

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा देशातील इतर भागांना चांगला फायदा झाला आहे. 31 ऑगस्टअखेरीस देशातील पावसाची तूट 14 टक्के होती. 28 सप्टेंबरपर्यंत ही तूट कमी होऊन 12 टक्क्यांवर आली आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतातील पावसाची तूट 31 ऑगस्टला 26 टक्के होती. 22 सप्टेंबरपर्यंत ती 27 टक्क्यांवर गेली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसामुळे 28 सप्टेंबरपर्यंत ही तूट 25 टक्क्यांवर आली. वायव्य भारतातील तूटही 11 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आली आहे.

तरीही महाराष्ट्रात पाऊस नाही…

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही या पावसाचा फायदा झाला. उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा 8 टक्के अधिक, तर उत्तराखंडमध्ये 9 टक्के अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात देशातील पावसाची एकूण स्थिती काही प्रमाणात सुधारली असली, तरी महाराष्ट्रातील पावसाची तूट मात्र कायम आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here