मुंबई : आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात क्राइम ब्रांचच्या तपासादरम्यान एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी साहिलने त्याच्या एका जवळच्या मैत्रिणीशी फोनवर संवाद साधला होता. या अखेरच्या संभाषणात त्याने परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडले गेल्याची कबुली दिल्याचे उघडकीस आले आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेचा पेपर संपवून हॉलबाहेर पडल्यानंतर साहिलने त्याच्या काही मित्रांशी संपर्क साधला होता. तसेच वसतिगृहात परतल्यानंतरही त्याने काही साथीदारांशी फोनवर संभाषण केले होते. पोलिसांच्या पथकाने या सर्व मित्रांचे अधिकृत जबाब नोंदवून घेतले आहेत. या संपूर्ण प्रकरणात क्राइम ब्रांचने साहिलच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. चौकशीदरम्यान समोर आले की, ही मैत्रिणच ती शेवटची व्यक्ती होती, जिच्याशी साहिलने आयुष्य संपवण्यापूर्वी प्रदीर्घ चर्चा केली होती.
परीक्षेतील गडबडीमुळे प्रचंड मानसिक तणावात होता साहिल
https://www.prahaar.in/2026/09/28/pincky-balhara-create-history-after-winning-bronze-medal-in-kurash-at-asian-games-2026/
मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘थर्मोडायनामिक्स’ (Thermodynamics) या विषयाचा थिअरी पेपर अत्यंत वाईट गेल्यामुळे साहिल कमालीच्या नैराश्यात होता. या परीक्षेत आपल्याला खूप चांगले गुण मिळवायचे होते, असे तो तिला वारंवार सांगत होता. मात्र, पेपर अपेक्षेप्रमाणे न गेल्यामुळे त्याच्यावर मोठा मानसिक दबाव निर्माण झाला होता. याच संभाषणात त्याने परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडले गेल्याचा उल्लेखही मैत्रिणीकडे केला होता. तथापि, या दाव्यांमध्ये नेमकी किती सत्यता आहे, हे पुढील सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
फोनवर आले होते अनेक कॉल्स अन् मेसेज
घटना घडल्यानंतर जेव्हा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी साहिलला मृत अवस्थेत पाहिले, तेव्हा पोलिसांनी तातडीने त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन तपासला. त्या वेळी त्याच्या फोनवर अनेक मिस्ड कॉल्स आणि मेसेज आलेले आढळून आले. साहिलचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचे अनेक मित्र सातत्याने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तीव्र मानसिक तणावात असल्यामुळे त्याने कोणाचाही फोन उचलला नव्हता.
आतापर्यंत सहाहून अधिक विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले
क्राइम ब्रांचची टीम या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. परीक्षा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा साहिलच्या मानसिक आरोग्यावर नेमका किती खोल परिणाम झाला होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. साहिलशी शेवटचे बोलणाऱ्या मैत्रिणीने सांगितले की, फोनवर बोलताना त्याच्या आवाजातील भीती स्पष्टपणे जाणवत होती. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत साहिलच्या वर्गमित्रांसह ६ हून अधिक सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. साहिलने हे पाऊल नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे उचलले, यामागचे मूळ कारण शोधण्यासाठी पोलीस प्रत्येक पुराव्याची साखळी जोडत आहेत.