Home महाराष्ट्र नाशिक Dhule Crime : गर्भवती महिलेच्या जळीत हत्याकांडाचा अखेर उलगडा, मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक

Dhule Crime : गर्भवती महिलेच्या जळीत हत्याकांडाचा अखेर उलगडा, मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक

0
Dhule Crime : गर्भवती महिलेच्या जळीत हत्याकांडाचा अखेर उलगडा, मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक

Dhule Crime : कला केंद्रातील अंतर्गत वादातून रायगडच्या एका गर्भवती महिलेची धुळ्यातील गरताडबारी येथे पेट्रोल ओतून जाळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला असून चौघांना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी महिलेची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिलेचं नाव पिंकी हनुमंत काटकर (वय 31, रा. रायगड) असं आहे.

नेमकं काय घडलं ?

चाळीसगाव-धुळे महामार्गालगत गरताडबारी परिसरात २२ सप्टेंबर रोजी एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. डायल ११२ वरून माहिती मिळाल्यानंतर मोहाडी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालातून मृत महिला गर्भवती असल्याचे आणि तिच्यासह पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला वेग दिला. या तपासात मृत महिलेची ओळख पिंकी हनुमंत काटकर, वय ३१, रा. रोहा, जि. रायगड अशी पटली.

https://www.prahaar.in/2026/09/28/shocking-case-of-cyber-blackmail-in-nashik-womans-mobile-hacked-obscene-videos-recorded-and-she-commits-suicide/

कला केंद्रात झालेल्या वादातून हत्येचा कट

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जामखेड येथील कला केंद्रात महिला आणि पुरुषांमध्ये झालेल्या वादातून हत्येचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, वादाचे नेमके कारण आणि हत्येमागील उद्देश अद्याप तपासाचा विषय आहे. या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा करत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात सर्फराज ऊर्फ शफिक अलीम मोमिन (वय 38, रा. धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (31, रा. धाराशिव), स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28, रा. अहिल्यानगर) आणि लक्ष्मी बालाजी पवार (30, रा. धाराशिव) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर फारुख शेख ( रा. धाराशिव) आणि रोहिणी जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे फरार असल्याची माहिती आहे.

मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा क्रमांक ३२२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी सफराज मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या हत्याकांडामागील नेमका हेतू काय होता? मृत महिला आणि आरोपींचे नेमके संबंध काय होते? तसेच हा कट कशाप्रकारे रचण्यात आला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.पुढील तपासात या प्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here